आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

भाट्ये येथे शाश्वत शेती दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि सुरक्षेचे आधारस्तंभ भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त ७ ऑगस्ट रोजी शाश्वत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे (रत्नागिरी) प्रकल्प संचालक विजय बेतीवार, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण माळशे, कृषी संशोधन केंद्र शिरगावचे प्रभारी अधिकारी डॉ. एन. जी. सोनोने, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी येथील शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी हेमंत फाटक, आत्माचा प्रकल्प उपसंचालक श्रीमती सायली फासके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक प्रतीक पाटील, रत्नागिरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बेतिवार यांनी केले. त्यानंतर श्रीमती सायली फासके यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या कार्याबद्दल सर्वांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर डॉ. किरण माळशे यांनी शाश्वत शेती याबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी संशोधन व तंत्रज्ञानाचा शाश्वत वापर, शेतीमधील निविष्ठांचा वापर, कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर, कृषी पूरक व्यवसाय पणन व मूल्यवर्धन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. सोनवणे यांनी अन्नसुरक्षा व ग्राम विदोत्पादन कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच सन २०२४ मध्ये संशोधन केंद्रामार्फत घेतलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमांमधून उत्कृष्ट परतावा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्या हस्ते करण्यात आला. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे “शाश्वत शेतीला नवीन उपक्रमांची जोड” याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी नैसर्गिक शेती, जैविक शेती, स्थानिक वाण संवर्धन मधुमक्षिका पालन गांडूळ खत निर्मिती याबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर रत्नागिरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी विनोदी हेगडे यांनी “तरुणांना कृषी क्षेत्रातील संधी” याविषयी माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांनी उपस्थित कृषी क्षेत्रातील नवीन उपक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी कालानुरू शेतीमध्ये प्राधान्यचे स्वरूप बदलले आहे, असे सांगितले. यापूर्वी अन्नसुरक्षा महत्त्वाची होती; परंतु आत्ता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्यानंतर आता पौष्टिकता महत्त्वाची आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावरून पौष्टिक तृणधान्य वर्षासारखे कार्यक्रम साजरे केले जातात. याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता मंडळ कृषी अधिकारी रत्नागिरी यांनी आभार प्रदर्शन करून केली. तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील रावेचे विद्यार्थी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!