रत्नागिरीत आज अनोखा अष्टावधान कला कार्यक्रम रंगणार

रत्नागिरी : संस्कृतभारती या संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संस्थेने गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, स्वानंद पठण मंडळ, विविध विद्यालये अशा विविध संस्थांच्या सहकार्याने संस्कृत सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाची सांगता आज (१२ ऑगस्ट) सायंकाळी ४ ते ७ या वेळेत झाडगाव येथील माधवराव मुळे भवनात अष्टावधान कलेच्या सादरीकरणाने होणार आहे. हा अनोखा कार्यक्रम बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृत भारतीच्या कोकण प्रांताध्यक्षा डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.
भारतीय शिक्षण परंपरेमध्ये अष्टावधान कला ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. जुन्या काळातल्या मौखिक परंपरांपैकी ही एक मौखिक परंपरा आहे. या कलेमध्ये जी मुख्य व्यक्ती आहे तिला अवधानी असे म्हटले जाते. ही व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देते. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला प्रच्छक म्हणतात. ८ प्रच्छक असतात तेव्हा अष्टावधान, १० प्रच्छक असल्यास दशावधान, १०० प्रच्छक असल्यास शतावधान तसेच अन्य प्रच्छक संख्येनुसार प्रकार आहेत.
या कार्यक्रमात बंगलोर येथील डॉ. उमामहेश्वर ना. हे अवधानी आहेत. शृंगेरी येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले असून त्यांनी ३० ठिकाणी अष्टावधान सादर केले आहे. प्रच्छक म्हणून श्री महाबलभट्ट, डॉ. दिनकर मराठे, डॉ. कल्पना आठल्ये, सौ. योगिता केळकर, मयूरी जोशी, चैतन्य पाडळकर, राजेश कुमार आणि मैत्रेयी आमशेकर सहभागी होणार आहेत.
आठ प्रश्न
अष्टावधानकलेच्या कार्यक्रमात निषिद्धाक्षरी (कोणत्याही विषयावर काव्य करताना विशिष्ट अक्षर वापरू नये), समस्यापूर्ती (एका चरणानुसार दुसरा चरण रचणे), दत्तपदी (दिलेल्या विशिष्ट शब्दांचे संस्कृत काव्य रचणे), आशुकाव्य (शीघ्र काव्य), चित्रकाव्य (वैचित्र्यपूर्ण बंधामध्ये काव्यरचना केली जाते आणि फलकावर त्या बंधाच्या आकृतीसह ते लिहून प्रेक्षकांना दाखविले जाते) दिले जाणार आहे. काव्यवाचन (श्लोक गायन केल्यावर तो श्लोक कोणत्या ग्रंथ, वृत्तातील शोधणे), संख्याबंध (संख्यात्मक कठीण गणित), आणि अप्रस्तुतप्रसंग (विचलित करण्याच्या दृष्टीने गोंधळात टाकणारे प्रश्न) असे आठ प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याची उत्तरे अवधानी देणार आहेत.


