कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

म्हसळा येथे इकोफ्रेंडली (शाडू मातीच्या) गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात

म्हसळा : येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या (इकोफ्रेंडली) गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

 

विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच हस्तकौशल्य विकसित व्हावे, त्याचबरोबर त्यांच्या अंगी असलेल्या नवनिर्मिती क्षमतेचा विकास व्हावा, अलीकडच्या माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात लुप्त होऊ पाहणाऱ्या कलेला नवसंजिवनी मिळावी, तालुक्यातील, शहारातील पारंपरिक व्यवसाय टिकून राहावा, आणि विद्यार्थी वर्गामध्ये ही कला रूजावी या मुख्य हेतूंनी ही कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेच्या सुरूवातीस न्यू इंग्लिश स्कूलतर्फे केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, कोषाध्यक्ष सुनील उमरोटकर, संचालक प्रा. शिरीष समेळ, तसेच कार्यशाळेचे मार्गदर्शक आणि वाचनालयाचा कर्मचारी वर्ग यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुनील उमरोटकर यांनी कार्यशाळेची रूपरेषा विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

कार्यशाळेसाठी म्हसळा शहरातील भूमीपुत्र आणि गेली ६० वर्षे गणपतीची मूर्ती घडविण्याच्या कलेशी निगडित असलेले कै. विठोबा पाभरेकर यांचे चिरंजीव जितेंद्र पाभरेकर, तसेच कै. विठोबा पाभरेकर यांचे नातू आणि म्हसळा शहरातील समाजसेवक व गणपती कारखानदार विशाल साईकर आणि म्हसळा शहरातील गणपती व देवीच्या मूर्ती घडविण्यात प्रसिद्ध असलेले प्रीतम कुडतुडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यशाळेत पाभरेकर यांनी गणपतीची माती कशी मळावी, त्यासाठी बैठक व्यवस्था कशी करावी, पाण्याचा वापर किती प्रमाणात करावा याबाबतीत सविस्तर माहिती दिली आणि प्रत्यक्षात मातीपासून गणपती कसा बनविला जातो? याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत असतानाच गणपतीचा जन्म कसा झाला? गणपतीचा एक दात अर्धा तुटलेला का असतो? गणपतीची पूजा करताना आपण गणपतीच्या कोणत्या पायाची पूजा प्रथम करतो? गणपतीच्या पाया जवळ उंदीर का असतो? त्याचबरोबर गणपतीचा भाऊ कार्तिकेय यांची कथा सांगतच मातीच्या गोळ्यापासून हाताच्या दोन बोटाचा जास्तीत जास्त वापर करून आणि विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष कृतीशील सहभाग घेऊन सुंदर अशी गणपतीची मूर्ती विद्यार्थ्यांना तयार करून दाखवली या कार्यशाळेत माती कामाची आणि हस्तकौशल्याची आवड असलेले एकूण ७२ विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदविला त्यांचा उत्साह आणि कुतुहलता खुप होती. दोन ते अडीच तास चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थी मनापासून सहभागी झाले.

यावेळी स्पर्धक पार्थ नंदकुमार गोवीलकर आणि पायल मिठाराम प्रजापती या दोन विद्यार्थ्यांनी गजाननाचे वाहन उंदीर मामा तयार करून जितेंद्र पाभरेकर यांच्या कार्यशाळेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. कार्यशाळेच्या शेवटी वाचनालयाचे संचालक प्रा. शिरीष समेळ यांनी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या इंकोफ्रेडली माझा बाप्पा या स्पर्धेबाबत माहिती देवून, स्पर्धेचे नियम विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वाचनालयाचे सर्व कार्यकारिणी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील, श्री. मोरे, सहशिक्षक श्री. कांबडी, श्री. आम्ले, श्रीमती शिर्के आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी स्पर्धक विद्यार्थ्यांना खांबेटे वाचनालयाचे माध्यमातून शाडूच्या मातीचे तयार गोळे देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!