मुख्य बातमी

दुर्वास पाटीलने एक, दोन नव्हे तर तब्बल ४ खून केल्याचे उघड; रत्नागिरी सुन्न

रत्नागिरी : जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. एका खुनाचा तपास उलगडत असताना दुर्वास पाटील या नराधमाने एक, दोन नव्हे तर तब्बल चार खून केल्याचे समोर आले आहे. पहिला खून सीताराम वीर (५०, वाटद-खंडाळा), दुसरा खून राकेश जंगम (२८, वाटद,खंडाळा), तिसरा खून भक्ती मयेकर आणि चौथा तिच्या पोटातील निष्पाप बाळाचा खून झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. तीन खुनाची अधिकृत माहिती समोर आल्यावर चौथा खून भक्तीच्या गर्भातील बाळाचा झाल्याची माहिती समोर येत आहे. या काळजाला पिळवटून टाकणाऱ्या उघडकीने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

सीताराम वीर (५०, वाटद-खंडाळा) हे दुर्वास पाटील याच्या सायली बारमध्ये कामाला होते.  त्यांना दुर्वास याने जबर मारहाण केली. आणि त्यात त्यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. राकेश जंगम (२८, वाटद, खंडाळा) याला सीताराम वीर यांच्या खुनाची माहिती होती. राकेशने घरी आईला सांगितले होते. ६ जून २०२४ रोजी तो “कपड्याची बॅग आणायला जातो”, असे सांगून घरातून गेला होता. पण तो कधी परतलाच नाही. आईने तो बेपत्ता असल्याची फिर्याद जयगड पोलीस ठाण्यात दिली होती. राकेश याला आपण “कोल्हापूरला जातो” असा खोटा बहाणा करून दुर्वास पाटील आणि नीलेश भिंगार्डे यांनी आंबाघाटात खून करून त्याचा मृतदेह टाकून दिला. एक वर्षभर बेपत्ता राहिल्याने गुन्हेगार दुर्वास निर्धास्त झाला होता.

यानंतर दुर्वासच्या डोक्यात भक्ती मयेकरला (२६, मिरजोळे) मारण्याचा प्लॅन शिजत होता. आंबा घाट हे निर्जन स्थळ असल्याने या ठिकाणी मृतदेह टाकल्यास सापडणार नाही अशी त्याला खात्री होती. त्याप्रमाणे भक्तीचा ही बारमध्ये दोरीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह आंबाघाटात रात्रीच्या वेळी फेकून दिला. दहा दिवस मृतदेह कुजत पडला, आणि दुर्वास निश्चिंतपणे फिरत राहिला. मात्र, या वेळी भक्तीच्या भावाने आवाज उठवला आणि पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संशयाची सुई थेट दुर्वासवर गेली. आणि चौथा खून भक्तीच्या गर्भातील बाळ. भक्ती मयेकर गर्भवती असल्याने या क्रूर खुनात एका निष्पाप जीवाचाही अंत झाला. हे उघड होताच जिल्हा सुन्न झाला.

भक्तीच्या खुनानंतर संशयावरून पोलिसांनी दुर्वास पाटीलला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत विश्वास पवार व निलेश भिंगार्डे यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत दुर्वासने एकामागोमाग एक खुनांची कबुली दिली आणि त्याच्या डोक्यातील रक्तरंजित किनार सर्वांसमोर आली.

गणेशोत्सवाच्या आनंदमयी वातावरणात घडलेल्या या खुनांनी रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. एकाच नराधमाने चार निर्दयी खून करून मानवतेलाच काळीमा फासल्याने सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!