अनुष्का चिपळूणकर यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्रदान

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जानवळे कोंडविलकरवाडी येथील अनुष्का चिपळूणकर यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षीप्रमाणे अंगणवाडी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवकांचा गौरव करण्यासाठी “आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. यंदा हा सोहळा कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, कीर्तनवाडी रोड, गुहागर येथे झाला. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत आदर्श अंगणवाडी सेविका अनुष्का चिपळूणकर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात समाजाभिमुख, सर्वोत्तम सेवा बजावली आहे. त्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र प्रदान आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अपूर्वा बारगोडे, पंचायत समिती सदस्य स्नेहा शिगवण, सारिका दाभोळकर, ऊर्वी खैर उपस्थित होत्या. पुरस्कारप्राप्त अंगणवाडी सेविका यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच गटविकास अधिकारी परेश शिरसाट, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद केळसकर यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आदर्श अंगणवाडी सेविका अनुष्का चिपळूणकर यांच्या कार्याचा गौरव करताना बालकांच्या संगोपन, पोषण व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या अंगणवाडीमध्ये विविध प्रकारचे प्रोत्साहनपर उपक्रम राबविले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



