केळ्ये येथे गुरूवर्य शांताराम यशवंत गोडबोले स्मृतिदिन

रत्नागिरी : केळ्ये येथे गुरुवर्य शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात शिक्षक दिन आणि गुरुवर्य शांताराम यशवंत गोडबोले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि गुरुवर्य गोडबोले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, “शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असतात,” असे मनोगतातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आज शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना शिकवले व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
गोडबोले स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संस्थात्मक कार्याचे स्मरण करण्यात आले. या प्रसंगी इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी श्रावणी केळकर हिने एस. वाय. गोडबोले सरांबद्दल माहिती सांगितली. गुरुवर्य गोडबोले यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे मार्गदर्शन मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील आणि शिक्षिका सौ. अनघा रसाळ यांनी केले. सूत्रसंचालन गार्गी केळकर हिने. वेदांत माने याने आभार मानले.



