कोतवडे बौद्धवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुखरूप सुटका

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडीमधील सार्वजनिक विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. या बिबट्याची वैद्यकीय तपासणीनंतर तो तंदुरुस्त असल्याची खात्री केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडीमधील सार्वजनिक विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कोतवडे गावचे सरपंच संतोष बारगोडे यांनी वनपाल पाली यांना दूरध्वनी वरून दिली. त्याप्रमाणे परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना माहिती देऊन रेस्क्यू टीम पिंजरा व आवश्यक त्या साहित्यासह तत्काळ घटनास्थळी रवाना झाली. ही विहीर भर वस्तीमध्ये असून ३ फूट उंचीचा चिरेबंदी कठडा असलेली आहे. विहिरीची खोली ४० फूट आहे. पाण्याची पातळी १० ते १२ फुटांवर असून हा बिबट्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी असलेल्या पायरीवर पाण्यात बसलेला असल्याचे दिसून आले. त्यानंतर तात्काळ पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडण्यात आला व बिबट्याला पिंजऱ्यामध्ये पंधरा मिनिटांच्या आतच सुरक्षित पिंजऱ्यामध्ये घेण्यात आला.

त्यानंतर कोतवडेचे पशुधन विकास अधिकारी अभिजीत भगवान कसाळकर यांच्याकडून बिबट्याची वैद्यकिय तपासणी करून घेतली. तो सुरक्षित असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. हा बिबट्या नर जातीचा असून, तो सुमारे ९ ते १० वर्षे वयाचा आहे. या विहिरीवर शेडनेट टाकलेले असून, भक्षाचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज आहे.
ही रेस्क्यूची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार, वनपाल (पाली) न्हानू गावडे, वनरक्षक (रत्नागिरी) विराज संसारे, वनरक्षक (जाकादेवी) श्रीमती शर्वरी कदम, शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे तसेच पोलीस अधिकारी मनोज पावसकर, श्री. वाडकर, होमगार्ड मनोज मोहिते, गावचे सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील प्रकाश पड्याळ, पोलीस पाटील सौ. पूर्वा पवार, सौ. वैष्णवी माने, सौ. दीया कांबळे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र हरी कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत तुकाराम फणसोपकर, मयुरेश मंगेश कांबळे, सुनील गोपाळ कांबळे, सुहास मोहिते, साहिल कांबळे, तसेच गावातील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वनाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

हा बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.


