राजापूर नगरपालिकेसाठी १९ कोटींचा विकास निधी मंजूर
पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश : प्रशासकीय इमारत, सभागृह, मार्केट व जलशुद्धीकरण प्रकल्प साकारणार

राजापूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा विशेष विकास निधी मंजूर केला असून, पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. १० जुलै रोजी शासनाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला.
या मंजूर निधीतून राजापूर नगरपालिकेसाठी विविध विकासकामांसाठी एकूण १९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय सभागृह, आधुनिक मच्छी व मटन मार्केट, शाळांची दुरुस्ती व सुशोभीकरण तसेच जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीपुरवठा योजनेची कामे हाती घेतली जाणार आहेत.
मंजूर कामांमध्ये नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ५ कोटी रुपये, बहुउद्देशीय सभागृहासाठी ३ कोटी रुपये, आधुनिक मच्छी व मटन मार्केटसाठी २.५ कोटी रुपये, शाळांच्या दुरुस्ती व उद्यान विकासासाठी ३ कोटी रुपये आणि जलशुद्धीकरण केंद्र व पाणीपुरवठा योजनेसाठी ५.५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
दरम्यान, रत्नागिरी नगरपालिकेसाठीही रस्ता अनुदान योजनेतून ५.७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विविध भागांतील पूल, रस्ते आणि जलनिस्सारण व्यवस्थेची कामे करण्यात येणार असून, पावसाळ्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निधीमुळे राजापूर आणि रत्नागिरी शहरांच्या नागरी सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून, दोन्ही शहरांच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


