पटवर्धन हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण व शिक्षक-शिक्षकेतर गुणगौरव समारंभ संपन्न

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे पटवर्धन हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण व शिक्षक गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. कॅ. सुभाषचंद्र ठाकूर सभागृहात झालेल्या या समारंभाचे अध्यक्षस्थान भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर यांनी प्रास्ताविक करून शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा, कला व सांस्कृतिक यशाचा आढावा घेतला. मान्यवरांनी प्रमुख अतिथींचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.

भारत शिक्षण मंडळाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जयेश जयचंद गुरव यांना प्राप्त झाला. युनायटेड उद्योग समूहाचा आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. मानसी चव्हाण यांना मिळाला. भारत शिक्षण मंडळाचा आदर्श शिक्षकेतर पुरस्कार सौ. अवंतिका आंबेकर यांना प्रदान करण्यात आला. शिष्यवृत्तीधारक, विविध विषयात प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी तसेच कला, खेळ, नृत्य, नाट्य या क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मार्गदर्शनपर भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनी विद्यार्थ्यांना “आभाळाला हात लावण्याचा प्रयत्न करा; आई-वडील व शिक्षक यांच्या प्रयत्नातूनच आपले घडतो, हे विसरू नका,” असे सांगितले.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमरे यांनी त्यांच्या शाळेच्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला.
समारंभात बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांची व शिक्षकांची नावे शिक्षक संदीप कांबळे, श्रीमती नागवेकर, श्रीमती पाटणकर, श्रीमती बोडेकर, श्री. भोये व श्रीमती बंडबे यांनी जाहीर केली. सूत्रसंचालन कौस्तुभ पालकर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. लवंदे यांनी केले.
उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बक्षीस वितरण समितीने कार्यक्रमाचे नियोजन उत्तम केले.
कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह दादा वणजू, संतोष कुष्ट्ये, पदाधिकारी व सदस्य, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष सुनील कीर, शिक्षक-पालक प्रतिनिधी यांची उपस्थिती लाभली. या सोहळ्यात शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांचा गौरव आणि संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा उत्सव अविस्मरणीय ठरला.



