एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी २ साठी इच्छुक स्त्री उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी २ मार्फत कासारी ग्रामपंचायती मधील कासारी, कोतवडेमधील कोतवडे मुस्लिमवाडी आणि कळझोंडी ग्रामपंचायतीमधील कळझोंडी सडेवाडी अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरायचे आहे. इच्छुक स्त्री स्थानिक उमेदवारांनी कासारी आणि कोतवडे मुस्लिमवाडीसाठी ८ ऑक्टोबरपर्यंत तर कळझोंडी सडेवाडी ६ ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करावेत.
नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील. खाडाखोड असलेले अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी २ यांनी केले आहे.
शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण आवश्यक (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) गुणपत्रक आवश्यक असून पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड, बी.एड असल्यास गुणपत्रक आवश्यक आहे. ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे मधील रहिवासी असणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी (By Nomination) वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहिल. तथापि, विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहील. विधवा/अनाथ असल्याबाबत दाखला, लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती तसेच इतर मागास प्रवर्ग/विमुक्त जाती/भटक्या जमाती/आर्थिकदृष्टया दुर्बल घटक/ विशेष मागास प्रवर्ग/ सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास वर्ग या प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला जोडला असल्यास गुणांकन देण्यात येईल. अंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक (एमएससीआयटी) अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरविलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास आवश्यक. गुणांकन ३० जानेवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार राहील.
हे अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी २, शंखेश्वर पार्क, बी विंग, रुम नं.७, जिल्हा परिषद शेजारी रत्नागिरी येथे करावेत. तसेच आवश्यक माहितीसाठी सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


