मुंबई विद्यापीठाच्या भारतीय समूह गीतगायन अंतिम फेरीत पाटपन्हाळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

आबलोली (संदेश कदम) : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५९ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२६-२७ ची भारतीय समूह गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई विद्यापीठ, ग्रीन टेक्नोलोजी ऑडीटोरीयम हॉल, विद्यानगरी कलिना, सांताक्रूझ (पूर्व) येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठातील एकूण ३४ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने ‘हिंदोस्ता हमारा’ या भारतीय समूह गीतगायनाचे सादरीकरण केले.
या स्पर्धेत महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. यामध्ये साक्षी पवार (तृतीय वर्ष वाणिज्य), मिताली शिगवण (द्वितीय वाणिज्य), सदिच्छा कदम (प्रथम वर्ष वाणिज्य), आदिती देवळे (प्रथम वर्ष वाणिज्य), रिया घाणेकर (प्रथम वर्ष वाणिज्य), सुदीक्षा भागडे (द्वितीय वर्ष कला) आणि प्रणव पालकर (द्वितीय वर्ष वाणिज्य) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, रत्नागिरी येथील कोरिओग्राफर अक्षय पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाची व सांस्कृतिक विभागाच्या कार्याची दखल घेत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.



