आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात एचपीव्ही लस जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : जिल्ह्यातील ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लस जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम ४ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), विजयसिंह जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी श्री. कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, माजी आरोग्य सभापती बाबू म्हाप, माजी नगरसेवक बंडयाशेठ साळवी यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.

.
आपल्या मनोगतात पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की, “रत्नागिरी हा एचपीव्ही लसीकरण सुरू करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. ९ ते १४ वयोगटातील सर्व मुलींनी ही लस नक्की घ्यावी. पालकांनीही पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे आरोग्य सुरक्षित करावे. रत्नागिरीचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माझ्या भावी पिढीला कॅन्सर होणार नाही, कॅन्सरसारख्या रोगापासून भावी पिढी वाचली पाहिजे. त्यासाठी अजून निधी लागला तर तो डीपीसीमधून, सीएसआरमधून दिला जाईल. आपल्या घरात आर्थिक ताण पडू नये, म्हणून महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्रामध्ये माझ्या महिला भगिनींची तपासणी झाली पाहिजे. महिला भगिणींनीही आपल्या आरोग्याची तपासणी करुन काळजी घेतली पाहिजे.”

लसीकरणाच्या बाबतीत सोशल मीडियावर गैरसमज पसरणार नाही, याबाबत काळजी घ्या. त्यासाठी या लसीचे फायदे, त्याची माहिती याचा प्रसार पालकांमध्ये करावा. ज्येष्ठांना न्यूमोनिया होऊ नये, त्यावरील लसीची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील कुपोषित माता, कुपोषित बालके यांची संख्या खूप कमी असली तरी ती शुन्यावर व्हायला हवी. तसेच, एचपीव्ही लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी आपल्या प्रस्ताविकात बोलताना एचपीव्ही लसीबद्दल सविस्तर माहिती देऊन सांगितले की, ही लस ९ ते १४ वयोगटातील मुलींना दिली तर पुढे गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळेल कारण ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. जिल्ह्यात ९ ते १४ वयोगटातील मुलींची संख्या ५२ हजार आहे. एचपीव्ही लसीकरण हे रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असून जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे यासाठीचे पूर्ण नियोजन झाले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी नमूद केले की, जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत एचपीव्ही लस उपलब्ध झाली असून ही सुरक्षित, प्रभावी आणि भविष्यात गर्भाशयमुख कर्करोगावर प्रतिबंध करणारी महत्त्वाची पायरी आहे.

या कार्यक्रमाला सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, पत्रकार, आरोग्य कर्मचारी, ९ ते १४ वयोगटातील मुली व त्यांचे पालक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व   महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले, तर सूत्रसंचालन दिनकर सिनकर व ऋजुदा जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. महेंद्र गावडे यांनी उपस्थितांचे  आभार मानले.

एचपीव्ही (HPV) बद्दल माहिती :
एचपीव्ही (HPV) म्हणजे काय?
-HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस.हा विषाणू लैंगिक संपर्कातून पसरतो.यामुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर तसेच इतर काही कॅन्सर होऊ शकतात.
– एचपीव्ही (HPV) लस ही सुरक्षित व परिणामकारक आहे.
– ९ ते १४ वयोगटातील मुलींना मोफत लस उपलब्ध.
– गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी लस हा प्रभावी उपाय.
– लहान वयात घेतलेली लस आयुष्यभर संरक्षण देते.
– लसीकरणानंतरही नियमित आरोग्य तपासणी आवश्यक.
– आई-वडिलांनी मुलींचे लसीकरण करून घ्यावे.
– कॅन्सरमुक्त समाजासाठी (HPV) लस घ्या – इतरांनाही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!