माजी सैनिक आणि जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचे निधन

रत्नागिरी : येथील माजी सैनिक तसेच प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचे आज (२२ जून) उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा धक्का बसला होता त्यांच्यावर पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शंकरराव मिलके यांनी आपल्या मिलके स्विमिंग अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण देत उत्कृष्ट जलतरणपटू घडवले. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे ते सर्वत्र”मिलके सर” या नावाने परिचित होते. रत्नागिरीतील जलतरण क्षेत्राच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते.
ते गेली अनेक वर्षे रत्नागिरी शहरातील किल्ला हनुमानवाडी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री उशिरा रत्नागिरी येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.



