आनंद जाधव यांच्याकडून ५ ग्रामपंचायतींना भारतीय राज्य घटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट

आबलोली (संदेश कदम) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील विश्वासू कार्यकर्ते आणि गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र कालकथीत शिवराम पांडुरंग जाधव आणि त्यांना खंबीरपणे सावली सारखी साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी कालकथीत प्रभावती शिवराम जाधव या आपल्या आई – वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचे धाकटे चिरंजीव आनंद शिवराम जाधव यांच्याकडून तालुक्यातील कुडली, सडेजांभारी, शिवणे, असोरे, आबलोली या पाच ग्रामपंचायतींना भारतीय राज्य घटना व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
गुहागर तालुक्यातील कुडली ग्रामपंचायत येथे पंचशील बौद्ध विकास मंडळ कुडलीचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, पंचशील बौद्ध विकास मंडळ कुडली या मंडळाचे सल्लागार व महाराष्ट्र बॅंकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अनंत कांबळे, तंटामुक्ती समीती अध्यक्ष अनिल जाधव, रवींद्र जाधव, तुकाराम शिवराम जाधव, आनंद शिवराम जाधव, साक्षी आनंद जाधव यांच्यासह कुडलीचे सरपंच नितीन गावणंग, ग्रामपंचायत अधिकारी हरिष कुळ्ये उपस्थित होते.

सडेजांभारी ग्रामपंचायत येथे आयोजित कार्यक्रमात सडेजांभारीच्या सरपंच श्रीमती वनिता डिंगणकर, ग्रामपंचायत अधिकारी अपूर्वा हुमणे, पोलिस पाटील प्रभाकर सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुर्वे, नुतन पवार, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आबलोली ग्रामपंचायत येथे सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, तंटामुक्त समिती अध्यक्ष आप्पा कदम, उपसरपंच अक्षय पागडे, बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक बबनराव कदम, ग्रामपंचायत सदस्य संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

असोरे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा शाखा तालुका गुहागर, बौद्धजन सेवा संघ असोरे या पक्ष व धम्म संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमावेळी पाली भाषेचे अभ्यासक व प्रा. विजय मोहिते, बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक बबन कदम,भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष अनंत मोहिते, सल्लागार एस. एल. सुर्वे, काशिनाथ सुर्वे, दिलीप सुर्वे, बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष आप्पा कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राज्य घटना व डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी कालकथीत शिवराम जाधव, कालकथीत प्रभावती जाधव यांच्या समाज कार्याचा गौरव करण्यात आला.



