मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गावतळेतील झोलाई देवी मंदिरात १४ घंटा चोरीला

दापोली तालुक्यात घंटा चोरीचे सत्र सुरूच

दापोली : संपूर्ण दापोली तालुक्यात पुरातन सुप्रसिद्ध देवस्थान म्हणून परिचित असलेले गावतळे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवी मंदिरात १२ जानेवारी रोजी चोरट्याने सुमारे १४ घंटा चोरल्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून यापूर्वी देखील या परिसरातील अनेक देवळातील घंटा चोरीला गेल्याने चोर हा माहितगार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१३ जानेवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देवीचे पुजारी बाळकृष्ण गुरव हे नेहमीप्रमाणे देवीची पूजा करण्यासाठी आले असता घंटा चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ही बातमी संपूर्ण गावात पसरली. बहुसंख्य ग्रामस्थांनी झोलाई देवी मंदिरात गर्दी केली. चोरट्यांनी प्रथम झोलाई देवी मंदिराच्या पायऱ्या चढून वर आल्यावर असलेली पहिली घंटा, तसेच गाभाऱ्यात जाण्याअगोदर असलेली मोठी घंटा आहे जिचे वजन सुमारे १५ किलो असावे, ती घंटा खुर्चाचा आधार घेत चोरल्या. त्यानंतर गाभाऱ्यातील दरदिवशीच्या पूजेस वापरण्यास येणारी घंटा (घाट) चोरली. तसेच झोलाई देवी मंदिरातील एकत्र अडकवलेल्या सुमारे ७ घंटा नेल्या. श्री मानाई देवी मंदिरात असलेली समोरील आणि इतर ३ घंटा चोरल्या आणि पसार झाले.
पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव हे आपल्या पथकासह मंदिरात दाखल झाले. त्यांनी श्री झोलाई देवी मंदिर, श्री मानाई देवी मंदिर, स्मशानभूमी या ठिकाणची पाहणी केली.
यावेळी राजकुमार यादव यांनी आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत असल्याचे नमूद केले. सोमवारी शेजारील गावात आठवडा बाजार भरला होता ती शक्यताही पडताळत असून, मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या, तसेच गावात येणाऱ्या फेरीवाल्यांना गावात येण्यास बंदी घालण्याच्या सूचना केल्या.
सुप्रसिद्ध मंदिरातील घंटा चोरीला गेल्याने भक्तगणातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी देखील या परिसरातील दोन चार गावातून अशाप्रकारची घटना घडली आहे. या घंटा पितळेच्या असून या पितळेला सध्या बाजारपेठेत सुमारे ७०० रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी हालचाल करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!