शिवसेना पदाधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आठवड्यातून एक वार उपस्थित राहणार

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा युवाधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आठवड्यातून एक वार उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा संघटक संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्या तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक सौ. नेहा माने व युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी प्रसाद सावंत यांना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आपल्या कार्यालयात आठवड्यातून एक वार बसून सर्वसामान्य नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्या सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार माजी खासदार राऊत यांच्या अभ्युदय नगर (नाचणे रोड, रत्नागिरी) येथील यशोधन अपार्टमेंटमधील संपर्क कार्यालयात हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा महिला संघटक तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. नेहा रवींद्र माने या सोमवारी दुपारी १२ ते २ यावेळेत, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम हे बुधवारी दुपारी १२ ते २ यावेळेत, जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा संघटक रत्नागिरी (दक्षिण) संतोष थेराडे हे गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत, तर युवासेना जिल्हा युवाधिकारी रत्नागिरी (दक्षिण) तथा शिवसेना शहर संघटक (रत्नागिरी) प्रसाद सावंत हे शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, शिव सहकार सेना, रिक्षा सेना व अंगिकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांसह नागरिकांनीही याची नोंद घ्यावी आणि उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



