गुहागर मनसेच्या दणक्याने शृंगारतळीतील रस्त्याचे खड्डे बुजवले
राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचा मनसेने केला गौरव

आबलोली (संदेश कदम) : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारतळी बाजारपेठेतील पुल मार्केट येथील रस्त्यावर पडलेल्या खड्डे सर्वांनाच मनस्ताप देणारे ठरत होते. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसात खड्डे न भरल्यास वृक्षारोपण करू, असा इशारा दिला होता. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या मनसे स्टाईल दणक्याने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी खूणेकर यांच्या सूचनेने तात्काळ खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केल्याने मनसे गुहागरच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचा मनसे गुहागर यांच्याकडून गौरव करण्यात आला.



