मुख्य बातमीराजकारण

डांबर खरेदीमध्ये ४४ कोटींचा घोटाळा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाचा केला गैरवापर; चौकशीची मागणी

रत्नागिरी : “रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २०२३ या कालावधीत डांबर खरेदीमध्ये अनियमितता झाली आहे. यामध्ये सुमारे ४४ कोटी ६९ लाखांची अनियमितता झाली आहे. हे पैसे पालिकेने चलन नसताना आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहेत. यासाठी आपल्या राजकीय पदाचा उदय सामंत यांनी गैरवापर केला आहे,” असा आरोप माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी केला आहे.

हॉटेल व्यंकटेशमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुलगा मिहिर आणि विराज माने उपस्थित होते. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची अशी मागणी जिल्हाधिकारी, ईडी, सीबीआय यांच्याकडे केल्याचे माने यांनी सांगितले.

याबबत अधिक बोलताना माने म्हणाले, “माहितीचा अधिकार कायदाअंतर्गत मिळवलेल्या कागदपत्रांचे परीक्षण केले असता नगर परिषदेच्या हद्दीतील जवळपास सर्वच डांबरी रस्त्यांची कामे सामंत कंत्राटदार प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले. या कंपनीला एकूण सुमारे ११४ कोटी ८२ लाख ८२ हजार १२२ इतक्या रकमेची रस्त्याची कामे देण्यात आली. त्यापैकी ४४ कोटी ६९ लाख २७ हजार रकमेच्या डांबरी रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता आढळून आली. संबंधित कंपनीचे चलन दिले नाही. चलन न तपासताच पालिकेने त्यांची देयके अदा केली आहेत. चलन सादर करणे आणि त्यांची तपासणी करणे अनिवार्य आहे.”

या नियमांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून देयके दिल्याने शासकीय निधीचा अपव्यय व गैरवापर झाल्याचा संशय असून, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

रत्नागिरी पालिकेमार्फत झालेले सर्व रस्तेकामांचे तांत्रिक आणि वित्तीय फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. कामाशी संबंधित सर्व मूळ आणि डिजिटल नोंदी तातडीने सील करून सुरक्षित ठेवण्यात याव्यात. ४४ कोटी निधीचा अपव्यय किंवा गैरवापर झाला असल्यास त्याची पारदर्शक चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार बाळ माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने आपल्याला व कुटुंबाला संरक्षण मिळावे, अशी मागणीही बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!