महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
७ हजार ३२७ अपूर्ण कामांपैकी २ हजार ६२४ पूर्ण : २ हजार ५१५ कामांमध्ये पंचनामे करुन बंद करण्याचे शासनाचे निर्देश

रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ७३२७ अपूर्ण कामांपैकी २६२४ कामे आज रोजी पूर्ण झालेली असून, उर्वरित ४७०३ अपूर्ण कामांमध्ये शासनाच्या निर्देशानुसार ३० टक्के पेक्षा कमी पूर्तता झालेल्या २५१५ कामांमध्ये पंचनामे करुन ती बंद करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, २३६५ पंचनामे अपलोड झालेले असून, उर्वरित अपूर्ण कामांचे पंचनामे तयार करुन अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे. असे स्पष्टीकरण आज रोजीच्या एमआयएस वरील आकडेवारीनुसार उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांनी दिले आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्टीकरण दिले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आज रोजी एकूण २०६१४ कामे अपूर्ण आहेत. त्यापैकी २०२१-२२ व त्यापूर्वीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर शासनाचा विशेष भर आहे. सन २०२०-२१ व त्यापूर्वीची एकूण कामे ७१,०६२ होती. त्यापैकी ६३,७३५ अपूर्ण कामे पूर्ण झालेली असून, शिल्लक कामे दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी एकूण ७३२७ कामे अपूर्ण होती.
त्याव्यतिरिक्त शिल्लक कामांबाबत जिओ टॅगिंग वर प्रलंबित असलेली ४३१ कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिल्लक ११०५ कामांची निधी मागणी करण्यात आलेली असून उर्वरित ६५२ अपूर्ण कामे तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असून त्यावर कार्यवाही सुरू आहे.
सर्व कामे यानुसार तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. शासनाच्या १०० दिवसीय कृती आराखड्यानुसार आयुक्त, मगांराग्रारोहयो, नागपूर यांजकडील अ.शा.प. क्र. आयुक्तालय/तां. शा/वै.का./कावि/६४३/२०२५ दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ अन्वये ३४१० अपूर्ण कामे १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
त्यापैकी १५ मार्चपर्यंत ८१५ कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार ६८२ कामे पूर्ण झाली असून उर्वरित सर्व कामे दिनांक १० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. अपूर्ण कामे विहीत मुदतीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलण्यात येत आहेत.



