मुख्य बातमी

विहिंप आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी घेतले जगद्गुरु नरेंद्राचार्य यांचे शुभाशीर्वाद

नाणीज (रत्नागिरी) : राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यात अग्रेसर असलेल्या विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी नुकतीच नाणीजधाम येथे तीर्थक्षेत्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची विशेष भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त केले. दोन आध्यात्मिक आणि सामाजिक शक्तींच्या या भेटीमुळे सनातनी वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

४१ सेवाकार्यांचा गौरव या भेटीदरम्यान आलोक कुमार यांनी विश्व हिंदू परिषदेच्या आगामी ध्येयधोरणांची आणि कार्याची माहिती जगद्गुरु श्रींना दिली. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ४१ प्रकारच्या अभूतपूर्व सामाजिक आणि मानव सेवाकार्यांची माहिती मिळताच, श्री. आलोक कुमार यांनी अत्यंत गौरवपूर्ण उद्गार काढले. “समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी सुरू असलेले हे सेवायज्ञ आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दोन तास वैचारिक मंथन नाणीजधाम येथे सुमारे दोन तास चाललेल्या या खास बैठकीत धर्म, भारतीय संस्कृती, संस्कार आणि सद्यस्थितीत सनातनी धर्मासमोरील आव्हाने यावर सखोल चर्चा झाली. जगद्गुरु श्रींनी यावेळी अत्यंत मौलिक मार्गदर्शन करताना धर्माची धुरा सांभाळणाऱ्या संघटनांना दिशादर्शन केले. “आपल्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी जगद्गुरुंचे मार्गदर्शन विश्व हिंदू परिषदेला वेळोवेळी मिळत राहावे,” अशी इच्छा श्री. आलोक कुमार यांनी यावेळी बोलून दाखवली.

युवा पिढी आणि अध्यात्म या प्रसंगी पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनीही आपले विचार मांडले. आजच्या तरुण पिढीला भक्ती, अध्यात्म आणि स्वधर्माशी जोडण्यासाठी कोणते विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे, यावर त्यांनी महत्त्वपूर्ण विश्लेषण केले.

भक्तीमय वातावरणात मुक्काम मंगळवारी सायंकाळी आगमन झाल्यानंतर श्री. आलोक कुमार यांनी नाणीजधामच्या पवित्र वातावरणात रात्रौ मुक्काम केला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता जगद्गुरु श्रींच्या आशीर्वादाची शिदोरी घेऊन ते आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना झाले. या भेटीने धार्मिक आणि सामाजिक स्तरावर एक नवा सकारात्मक संदेश दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!