मुख्य बातमी

रत्नागिरीतील अपूर्ण पाणी योजना ही सर्वात मोठी शोकांतिका : राजेश सावंत

रत्नागिरी : रत्नागिरी शहरवासीयांना पाण्यासारखी मूलभूत जीवनावश्यक वस्तूही पूर्णपणे उपलब्ध होऊ शकली नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, असे सांगत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी २०१६ मध्ये मंजूर झालेल्या ५४ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर थेट बोट ठेवले.

शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषेकडेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि आपली कन्या सौ. शिवानी सावंत-माने यांना विजयी करण्याचे आवाहन करतानाच रत्नागिरीतील नागरी सुविधांच्या दुरवस्थेवर, विशेषत: अपूर्ण पाणीपुरवठा योजनेवर, तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले. तत्कालीन प्रशासनाने ही योजना अपूर्ण स्थितीत असताना आणि कोणतीही तांत्रिक पाहणी न करता ताब्यात घेतली. याच गंभीर चुकीमुळे नागरिकांना आजवर सुरळीत पाणी मिळालेले नाही. २०२५ पर्यंतही ही योजना पूर्ण होऊ शकली नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्यानंतर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. येणाऱ्या नवीन प्रशासनाने या अपूर्ण योजनेचा तातडीने पुनरावलोक करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

विकासकामांच्या प्राधान्यक्रमावर टीका करताना श्री. सावंत म्हणाले की, नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे पुतळे, तसेच शिवसृष्टी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले. या प्रकल्पांसाठी नगरपालिकेला मोठा आर्थिक भार उचलावा लागला. याऐवजी, गटार, मीटर आणि भुयारी गटार योजना यांसारख्या शहराच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत सुविधांवर पैसे खर्च करणे अधिक गरजेचे होते.”

शहरातील भुयारी गटार योजनेचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) जुना झाला आहे. तसेच, पाण्याच्या समस्यांमुळे वारंवार रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याशिवाय, इंदिरा आवास योजनेतील नागरिकांच्या जागेच्या मुदतवाढीचा प्रश्न न सोडवल्याबद्दलही त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.

नेतृत्वाच्या अभावामुळे नगरपालिका दुसऱ्यांदा (२०११ नंतर आता २०२५ मध्ये) आर्थिक संकटात सापडली आहे, हे सत्य राजेश सावंत यांनी स्पष्टपणे कबूल केले. नगरपालिकेच्या कारभारावर आणि संस्थेच्या स्थिरतेवर तेथील नेतृत्व कसे आहे, यावरच सगळे अवलंबून असते, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या कन्येच्या माध्यमातून शहराला सक्षम आणि सेवाभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आता पक्ष न पाहता, शहराच्या समस्या सोडवणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन मतदारांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!