मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दादर पॅसेंजरसाठी २ ऑक्टोबरला उपोषण

खेड : कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्यरेल्वेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ‘जल फाउंडेशन कोकण विभाग’ या संस्थेने मध्यरेल्वेच्या दादर स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला. २ ऑक्टोबरला हे उपोषण होणार असून, प्रवाशांच्या मागण्या मान्य न झाल्यास हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष नितीन जाधव यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरपर्यंत चालवा, अशी मागणी आहे. १९९६ पासून सुरू असलेली आणि मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या नावाखाली अचानक बंद केलेली ५०१०३/५०१०४ रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत दादरपर्यंत चालवण्याची प्रमुख मागणी आहे. या गाडीमुळे कोकणातील प्रवाशांना मुंबईपर्यंत थेट प्रवास करणे सोपे होते. मुंबई आणि चिपळूणदरम्यान एक नवीन दैनिक गाडी सुरू करण्याची मागणी आहे, या गाडीमध्ये द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअरकार आणि सामान्य अनारक्षित डबे असावेत. ही गाडी दादर, ठाणे, पनवेलसह रोहा, खेड आणि अंजनी अशा अनेक महत्त्वाच्या थांब्यांवर थांबावी. प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी मुंबईतून पहाटे लवकर सुटून चिपळूणहून दुपारी किंवा सायंकाळी परत फिरावी, अशी शिफारस केली आहे. ‘नमो भारत’ किंवा ‘वंदे मेट्रो’सारख्या आधुनिक रेल्वेने ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा मोठा फायदा होईल, असेही सूचित करण्यात आले आहे.

गेल्या चार वर्षांहून अधिक काळ ‘जल फाउंडेशन’ सातत्याने मध्यरेल्वेकडे या मागण्यांचा पाठपुरावा करत आहे. या संदर्भात अनेक पत्रव्यवहारही करण्यात आले आहेत; मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग निवडल्याचे जाधव यांनी सांगितले. ‘जल फाउंडेशन’चा हा उपोषणाचा इशारा कोकणच्या रेल्वेप्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडणारा ठरू शकतो. कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची वाढती संख्या पाहता या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. रत्नागिरी पॅसेंजरसारखी जुनी आणि लोकप्रिय गाडी पुन्हा सुरू झाल्यास आणि एक नवीन मुंबई-चिपळूण गाडी सुरू झाल्यास कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. रेल्वेप्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!