मुख्य बातमी

रत्नागिरीत शनिवारी शास्त्रीय गायन व तबला सोलोवादन

रत्नागिरी : लक्ष्मण गाड स्मृती संगीत मैफलीत शनिवारी (ता. ३) नाशिक येथील शास्त्रीय गायक अथर्व वैरागकर यांच्यासह सौ. विनया परब यांची शिष्या स्वरा अमित भागवत यांचे शास्त्रीय गायन, तसेच रत्नागिरीतील तबलावादक केदार लिंगायत यांचे तबला एकल वादन होणार आहे. थिबा पॅलेसजवळील स्वामी गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता ही मैफल रंगणार आहे.

स्वराभिषेक संगीत वर्गाच्या संचालिका विनया परब यांचे वडील कै. लक्ष्मण गाड (गोवा) हे भजनी मास्तर होते. त्यांनी सिंधुदुर्ग व गोवा राज्यात अनेक शिष्य घडवले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी रत्नागिरीत संगीत मैफलीचे आयोजन करण्यात येते. मैफलीतील कलाकार अथर्व वैरागकर वैरागकर हे गायन विषयात विशारद असून त्यांनी पं. शंकरराव वैरागकर आणि गायत्री जोशी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेतली आहे. त्यांनी अनेक स्पर्धांत यश मिळवले असून देशभरातील अनेक महोत्सवात सादरीकरण केले आहे. स्वरा भागवत ही वयाच्या आठव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत आहे. अनेक शास्त्रीय, सुगम, नाट्यगीत गायन स्पर्धांमध्ये जिल्हा व राज्यस्तरावर तिने पारितोषिके पटकावली आहेत.

तिसरे कलाकार केदार लिंगायत यांचे तबल्याचे प्राथमिक शिक्षण वडील कृष्णा लिंगायत यांच्याकडे झाले. त्यानंतर हेरंब जोगळेकर, प्रसाद करंबेळकर आणि सध्या पं. आमोद दंडगे यांच्याकडे तबल्याचे प्रगत शिक्षण घेत आहेत. ते अलंकारची प्रथम परीक्षा उत्तीर्ण असून रत्नागिरीत तबलावर्गाच्या माध्यमातून अनेक शिष्य घडवत आहेत. राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या अनेक नाटकांना त्यानी तबलासाथ केली असून नामवंत गायक, कीर्तनकारांना साथसंगत केली आहे. या मैफलीत हार्मोनियमसाथ महेश दामले, विलास हर्षे, वरद सोहोनी, तर तबलासाथ गोव्याचे तबलावादक प्रा. अमर मोपकर व रत्नागिरीतील पुष्कर सरपोतदार करणार आहेत. ध्वनिसंयोजन एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत करणार असून गगनगिरी महाराज आ़श्रमाचे व्यवस्थापक राम पानगले यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!