महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश
महाराष्ट्राचा, कोकणवासियांचा हा अभिमान : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : युनेस्कोने काल जी जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर केली, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले ११ किल्ले समाविष्ट झालेले आहेत. हा महाराष्ट्राचा अभिमान तर नक्कीच आहे आणि कोकणवासियांचा देखील अभिमान आहे, अशी प्रतिक्रीया पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, राजधानी रायगडसह सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या जलदुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये मानांकन मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा जागतिक पातळीवर नेण्याच्यादृष्टीने युनेस्कोने घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी अभिमानाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कारकीर्द या महाराष्ट्रामध्ये केली, त्याला उजाळा देणारा आहे.
तामिळनाडूमधील एक किल्ला त्याच्यामध्ये आहे. तामिळनाडू सरकारचे देखील मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्राने वर्षोनुवर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपल्यामुळे आणि ही सगळी जी स्थळं आहेत, ही आमची मंदिरं आहेत, अशा भावनेतून महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांकडे बघितल्यामुळे आज त्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये मानांकन मिळाले आहे. युनेस्कोचे देखील मनःपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ज्वलंत इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचे सरकार कटिबद्ध आहे, हे देखील या ठिकाणी सांगतो.



