भाजपा जिल्हा संयोजक ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला नगरसेवकांचा सत्कार

रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांचा सन्मान सोमवारी सायंकाळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला.
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत प्रथमच नगरसेविका म्हणून प्रभाग १५ मधून निवडून आलेल्या वर्षा ढेकणे आणि प्रभाग १ मधून नितीन जाधव, प्रभाग १० मधून नगरसेविका मानसी करमरकर, नगरसेवक राजेश तोडणकर, प्रभाग ११ मधून सुप्रिया रसाळ आणि नगरसेवक समीर तिवरेकर यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ देऊन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला.
भाजपने महायुतीमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली व सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. तसेच नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांना देखील प्रत्येक प्रभागातून मताधिक्य दिले आहे. याबद्दल भाजपच्या सर्व नगरसेवकांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी स्वामी व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज तसेच भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप रसाळ, सचिन करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभागाच्या विकासासाठी काम करावे. चांगल्या योजना प्रभागासाठी आणाव्यात, प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. रस्ते विकास, गटार बांधकाम, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य याकडे विशेष लक्ष द्यावे आणि नगरपालिकेत चुणूक दाखवावी, अशी सूचनाही ॲड. पटवर्धन यांनी या वेळी केली.



