आदिशक्ती अभियान समितीमार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य प्रभातफेरी

रत्नागिरी : तालुक्यातील ग्रामपंचायत जयगड आदिशक्ती अभियान समितीमार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी पेठवाडी मराठी शाळा या ठिकाणाहून सुरू होऊन साईमार्गाने ग्रामपंचायत जयगड सडेवाडी मराठी शाळा आणि पुन्हा तेथून ग्रामपंचायत जयगड कार्यालय अशी काढण्यात आली होती.
यानंतर ग्रामपंचायत जयगडच्या छत्रपती श्रीशिवाजी महाराज सभागृहात महिलांसाठी मार्गदर्शनपर मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षा सौ. स्वप्ना मयूर खाडे यांनी भूषविले. सचिव श्रीमती तारका पारकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे स्वागतगीत सौ. वैष्णवी विश्वास पवार यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केले. सर्वप्रथम उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती श्रीशिवाजी महाराज, आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच श्रीलक्ष्मी देवी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला जयगड विद्यामंदिर येथील प्रा. सौ. श्रद्धा पाष्टे, सौ. पारकर सिस्टर, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत कुळ्ये, आदिशक्ती अभियान समितीचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच जयगड अनिरुद्ध साळवी, पर्यवेक्षिका श्रीमती केतकर, श्रीमती तारका पारकर, सडेवाडी शाळेचे श्री. पवार, श्रीमती श्रुती मेस्त्री, जयगडचे पोलीस पाटील प्रसाद गुरव, जयगड विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप वाघोदे, तसेच आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षा सौ. स्वप्नजा खाडे यांनी मार्गदर्शन केले. खास आकर्षण म्हणजे कुमारी ओवी परकर या चिमुरड्या मुलीने संविधान अर्पण पत्रिकेचे केलेले मुखोद्गत वाचन.

यावेळी जयगडमधील महिला भगिनी तसेच विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. प्रभात फेरीमध्ये मुलींच्या हातामध्ये महिलांबाबत घोषणा वाक्य फलक होते. महिला सक्षमीकरण, सबलीकरण, स्वावलंबीकरण याबाबत घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कमलाकर बोरकर, जयगडच्या तलाठी श्रीमती श्रद्धा दैत, आदिशक्ती अभियान समितीचे सदस्य तथा माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पारकर, माजी पोलीस पाटील विकास पारकर, दिलीप राऊत,माजी सरपंच श्रीमती डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी करताना ग्रामपंचायत जयगडचे सर्व कर्मचारी श्रीमती हर्षदा खाडे, पूनम देवरुखकर, प्रमोद झगडे, सुयुत संतोष पवार, पेठवाडी शाळेचे श्री. पवार, जयगड उर्दू शाळेचे श्री. चामे, सडेवाडी मराठी शाळेचे श्री. पिसे, आशा सेविका सौ. साक्षी खाडे, श्री. बाविस्कर, विकी पारकर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच या अभियानाची आकर्षक रंगावली जयगडचे सुपुत्र प्रसिद्ध रांगोळीकार गणेश पांडुरंग भोपळे यांनी काढली.



