पंचमुखी सेवा संस्थेतर्फे पिरंदवणे नं. १ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

संगमेश्वर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी व महागाईच्या काळात त्यांच्या पालकांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंचमुखी सेवा संस्था, भांडुप (मुंबई) च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्याचा स्तुत्य कार्यक्रम राबविण्यात येतो.
जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत योगदान म्हणून आज पंचमुखी सेवा संस्थेच्या माध्यमातून वह्या व अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी संस्थेचे आभार मानत उच्च गुणवत्ता संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. शाळेच्या व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. वैदेही गुरव, उपशिक्षक सचिन इंगळे व योगेश मुळे व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.



