मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोली वरची पागडेवाडी येथे २७ मार्च रोजी ग्रामदेवता नवलाई देवीच्या पालखीचे आगमन

आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळाच्या वतीने पालखी मिरवणुकीसह घोरीपोत्सव, नमनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली वरची पागडेवाडी येथे आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ (रजि.) सांस्कृतिक कलामंच आयोजित ग्रामदेवता आई श्री नवलाईदेवीच्या पालखीच्या आगमनानिमित्त (घोरिपोत्सव) उद्या (२७ मार्च) सायंकाळी ४ वाजता प्रतिवर्षी प्रथेप्रमाणे भव्य मिरवणूक निघणार आहे. आबलोली सोनार वाडी येथील श्री भगवती देवीच्या देवळातून आबलोली बाजारपेठमार्गे आबलोली वरची पागडेवाडी येथे या मिरवणुकीचे आगमन होईल.

यावेळी महिलांच्या वतीने औक्षण, आरती करून तसेच लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत ठिकठिकाणी पालखीचे जोरदार जंगी स्वागत केले जाणार आहे. ग्रामस्थांच्या, भक्तगणांच्या भेटीला आई नवलाईदेवी वाडी – वस्तीवर, घरो – घरी येणार म्हणून आई नवलाईदेवीच्या भक्तगणांच्या आनंदाला उधाण आले आहे.

यानिमित्त आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळाच्या वतीने रात्री १० वाजता कोकणची सांस्कृतिक लोककला बहुरंगी नाट्य नमनाचा कार्यक्रम सादर होईल. आई चरणी आराधना व श्री गणेशाला वंदन करून नटखट गौळणींसह कौशल्य पूर्ण अतरंगी कलाकारांनी साकारलेला निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक गोविंद पागडे लिखित “प्रेमासाठी काय पण..!” हे विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे. या वगनाट्याचे सूत्रधार म्हणून नितीन मोहन पागडे, मृदुंग मणी वादक अंकुश बाबू पागडे, ढोलकी वादक शैलेश पागडे, निर्मिती सहाय्यक, गायक म्हणून नितिन दत्ताराम घाणेकर तसेच मेकअपमण म्हणून आशिष उर्फ पप्पू भोसले हे काम करणार आहेत. वाडीतील नमन हौशी कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत.

आबलोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भक्तगण मंडळींनी पालखी आगमन सोहळ्यात सहभागी होऊन घोरीपोत्सव, नमन कार्यक्रमास बहुसंख्येने वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ (रजि.) चे अध्यक्ष मधुकर गो. पागडे आणि कार्यकारी मंडळाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!