मुख्य बातमी

‘आरबीआयच्या’वतीने गणपतीपुळ्यात आर्थिक साक्षरता शिबिर

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहार, शासकीय योजना आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी गणपतीपुळे येथे विशेष आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय रिझर्व बँकेसह विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य महाप्रबंधक पुनीत पंचोली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी आरबीआयच्या कामकाजावर प्रकाश टाकला. “बचतीची सवय लावणे आणि बदलत्या काळात ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे,” असे आवाहन श्री. पंचोली यांनी केले.

बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक बलराज टंडन यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई), स्वयं-सहाय्य गट आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध बँक योजनांची सविस्तर माहिती दिली.

राज्यस्तरीय बँकर्स समितीचे उप महाप्रबंधक दीपक पाटील यांनी सिबिल स्कोअरचे महत्त्व सांगून कर्जाची वेळेत परतफेड करण्याचे फायदे स्पष्ट केले. यावेळी पीएमएसबीवाय योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास बँक ऑफ इंडियामार्फत २ लाख रुपयांच्या दाव्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

रिझर्व बँकेचे श्रीकांत जाधव यांनी युपीआय व्यवहार करताना घ्यायची काळजी आणि डिजिटल फसवणुकीपासून वाचण्याचे उपाय सांगितले. जालना येथील उत्कर्ष अ‍ॅडव्हर्टायझिंग यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘नुक्कड नाटकाने’ उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले व आर्थिक साक्षरतेचा संदेश मनोरंजक पद्धतीने पोहोचविला. या शिबिरास नरेंद्र देवरे आंचलिक प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, बेनझीर शेख प्रबंधक, आरबीआय, दर्शन कानसे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, प्रथमेश सरमळकर शाखा व्यवस्थापक, बीओआय गणपतीपुळे, साक्षी वायंगणकर तालुका अभियान व्यवस्थापक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

या शिबिरात परिसरातील २०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. बँक मित्रांच्या मदतीने यावेळी प्रधानमंत्री जनधन योजना, पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय आणि अटल पेन्शन योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरबीआयचे प्रबंधक विशाल गोंदके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्री. कानसे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!