रत्नागिरीत श्री सत्यसाई जन्मशताब्दीनिमित्त विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
विजेत्यांचा गौरव

रत्नागिरी : श्री सत्यसाई जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून येथील श्री सत्यसाई सेवा समिती यांच्या वतीने शहरात विविध तीन स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, ११ जानेवारी रोजी या स्पर्धांचे निकाल जाहीर करून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ‘श्री सत्यसाई भजन व अभंग स्पर्धा’, ‘शालेय स्तरावरील चित्रकला स्पर्धा’ (लहान व मोठा गट) आणि ‘खुली रांगोळी स्पर्धा’ अशा तीन गटांत स्पर्धा पार पडल्या. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आली.
स्पर्धेचे निकाल असे (अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक) : अ) श्री सत्यसाई भजन व अभंग स्पर्धा : अर्णव सरपोतदार, सावनी सरपोतदार, जुई जोशी. ब) चित्रकला स्पर्धा (लहान गट) : ईशान साईनाथ नेवरेकर, निधी शेखर जोशी, विवांश गणेश पवार. चित्रकला स्पर्धा (मोठा गट) : आभा ऋषिकेश भाटवडेकर, श्लोक समीर पडवेकर, श्रेयश संतोष जाधव. ड) रंगावली (रांगोळी) स्पर्धा : विलास विजय रहाटे, ओंकार केशव भाताडे, सेजल संदीप चांदरकर.
पारितोषिक वितरण समारंभाला अभय खानोलकर, श्री सत्यसाई समितीचे प्रमुख भूषण बेलवलकर आणि रायगड-रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष कैलास गावडे उपस्थित होते. मान्यवरांनी विजेत्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समितीच्या या उपक्रमाचे शहरवासीयांकडून विशेष कौतुक होत आहे.

