राजापूरमध्ये पांचाळ सुतार समाजातर्फे विश्वकर्मा जयंती साजरी

राजापूर : शहरातील विश्वकर्मा मंदिरामध्ये पांचाळ सुतार समाज बांधवाच्यावतीने विश्वकर्मा जंयती साजरी करण्यात आली. यावेळी पांचाळ सुतार समाजाच्या भव्य मेळावा आयोजित केला होता. यावेळी आमदार किरण सामंत यांनी उपस्थित राहत आमदार म्हणून मी पांचाळ सुतार समाजाच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द आमदार सामंत यांनी भव्य मेळाव्यात दिला.
समाजाच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पुढे बोलताना त्यांनी पांचाळ सुतार समाजाने परंपरेने कष्ट, कौशल्य आणि प्रामाणिकपणाची मूल्ये जपली आहेत. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या युवकांनी शिक्षण, उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे, असे आवाहन करत आमदार सामंत यांनी समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सौ. स्नेहल सुतार यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी एकजूट होण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यास समाजाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अविनाश लाड, अर्बन बँक चेअरमन ॲड. शशिकांत सुतार, ॲड. यशवंत कावतकर, भाजपाचे रविद्र नागरेकर, अध्यक्ष संजय मेस्त्री, कार्याध्यक्ष बळवंत सुतार, सचिव सुनील मेस्त्री, तसेच समाजाचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष संजय मेस्त्री यांच्या हस्ते समाज बांधवाच्या वतीने आमदार किरण सामंत, अर्बन बँक नुतन चेअरमन ॲड. शशिकांत सुतार यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सुतार, प्रास्ताविक ॲड. सुनील मेस्त्री यांनी केले. आभार वैभव नांदगावकर यांनी मानले.



