मुख्य बातमी

रत्नागिरी तालुक्यात १६ जणांची निवडणुकीतून माघार

गोळप मधून उदय बने, तर हातखंबा येथून परशुराम कदम मैदानात

रत्नागिरी : तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोळाजणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजपचे पदाधिकारी आणि बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नाचणकर दांपत्यांने उमेदवारी अर्ज मागे घेतला; मात्र गोळपमध्ये उदय बने यांनी, तर हातखंबामध्ये पर्शुराम कदम यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून दोन्हा गटांमध्ये हायहोल्टेज लढत होणार आहे. दोघांचीही निशाणी नारळ असणार आहे. एकूण सहा अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदेला रिंगणात आहेत.

रत्नागिरी तालुक्यात वाटद, खालगाव, हातखंबा, कर्ला व गोळप या जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा परिषदेच्या दहा गटांमध्ये ३८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ८ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये खालगावमध्ये सचिन पाचकुडे, हातखंबामध्ये सुनील कांबळे, खेडशीतून सुचिता संदीप नाचणकर, गोळपमधून विनोद शिंदे, कोतवडेतून साधना साळवी, पावसमधून सचिन गिजबिले, संदीप शिंदे, वाटदमधून रूपाली पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामध्ये गोळपमधील विनोद शिंदे हे उबाठाचे उमेदवार होते. उबाठाने या गटात माजी उपाध्यक्ष उदय बने यांना पाठिंबा दिला आहे. तर हातखंबा गटात शिवसेना शिंदेंचे बंडखोर उमेदवार माजी समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम यांनीही रिंगणात कायम रहात रणशिंग फुंकले आहे. उदय बने व पर्शुराम कदम या दोघांनीही नारळ हे चिन्ह घेतले आहे.

पंचायत समिती गणांमध्ये करबुडे गणातून मिलिंद खानविलकर, कर्लामधून आलिया बेगम मुराद अहमद मजगावकर, खेडशीतून संदीप कृषणा नाचणकर, कुवारबावमधून कल्पेश भार्गव जाधव, साखरतरमधून वैभव बोरकर, गोळपमधून विनोद शिंदे, कोतवडेतू स्वप्नील पड्याळ आणि साखरतर गणामधून नाझीम अब्दुल हमीद मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. पंचायत समितीच्या २० जागांसाठी आता ४३ उमेदवार रिंगणात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!