आरोग्यआर्टिकल

नैराश्य – मानसिक संघर्ष आणि उपचार

मनावरची निराशा – डिप्रेशन झटकण्यासाठी आज जगातील असंख्य लोक मानसिक संघर्ष करत आहेत. मन हे अतिशय गूढ आहे. मन आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही; पण मनामध्ये येणारे अनेक विचार, त्या मनाचं अस्तित्व आपल्याला सतत दाखवत असतात.
मला सुख हवं आहे, मला समाधानाने जगायचं आहे हे प्रत्येकाला वाटत असतं. मग, सुख मिळविण्यासाठी मनाला इतका संघर्ष का करावा लागतो? मन सतत उदास, निराश का राहतं? १० ऑक्टोबर रोजी झालेल्या “जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाच्या निमित्ताने निराशेमधून/डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं हे जाणून घेऊया.

निराशा/डिप्रेशनची कारणे – आयुष्यात नको असलेल्या घटनांमुळे आपण निराश होतो, जसे की आर्थिक, करियरमधील अडचणी, सततचे अपयश, नातेसंबंधान मधील संघर्ष आणि दुरावा, भांडणे, अपमान, आरोग्याच्या तक्रारी, लग्न न होणे, म्हातारपणातील एकाकीपणा अशी अनेक कारणे या मागे असतात. एखादी व्यक्ति २ ते ३ आठवड्यांपेक्षा अधिक अति दुःखामध्ये राहिली की ती डिप्रेशन मध्ये जाते.

निराशा / डिप्रेशनची लक्षणे – एकटेपणा, भूतकाळातील आठवणींमध्ये जगणे, खूप जास्त वेळ विचार करत सुस्त पडून राहणे, स्वतःला दोष देणे, बोलायची आणि संवादाची इच्छा संपणे, काम करण्याची इच्छा संपणे, आयुष्यात आनंद उरला नाही असे वाटणे, अंग दुखी, सतत डोके दुखणे, पोट बिघडणे, पचनाचा त्रास, ही आणि अशी अनेक कारणे या मागे आहेत. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी पुढील काही उपाय बघूया –

1. योगासने भुजंगासन, सेतूबंधासन, ताडासन यांसारखी आसने केल्याने शरीराचा थकवा कमी होतो. नर्व्हस सिस्टीम शांत होते. निराशेमुळे सुस्त झालेल्या शरीरातील हात, पाय, पाठीचे स्नायू मोकळे व्हायला, आळस कमी व्हायला मदत होते. थायरोईड ग्लांडचे संतुलन सुधारू शकते आणि तणावामुळे बिघडलेले पचन सुधारते.

2. दीर्घ श्वसन – नैराश्यात असलेल्या व्यक्तीने दीर्घ श्वसन केल्याने विचारांचा गोंधळ कमी होतो.

3. जपानमध्ये प्रसिद्ध असणारी आधुनिक क्राय थेरपी. मनात खूप दिवस दाबून ठेवलेल्या विचारांना वाट मोकळी करून देण्यासाठी भरपूर रडायचं आणि ओरडायचं असं ही थेरपी सांगते. मुळातच दुःख देणारी घटना घडली की आपल्या डोळ्यातून पाणी येते, ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. रडणे चांगले नाही असे म्हटले जाते. पण क्राय थेरपीमधील रडणे हे मनातील भावना मोकळ्या करण्यासाठीचा एक मार्ग आहे आणि म्हणून तो सकारत्मक मानसिक उपचार आहे.

रडल्यामुळे इंडोमोर्फीन आणि ओव्झीटोसिन या दोन हार्मोन्सची निर्मिती अधिक होते. यांना फील गूड हार्मोन्स म्हणतात. यामुळे आपला मूड चांगला, ताण कमी होतो, हलके वाटायला लागते, चांगली झोप येते, काही काळासाठी मेंदू शांत होतो, काम करण्याची स्फूर्ती मिळते आणि भावना मोकळ्या झाल्याचे समाधान मिळते. एकांतामध्ये बसायचे, झालेल्या सर्व घटना आठवायच्या, किंवा अगदी एखाद्या जवळच्या /परक्या व्यक्ती सोबत आपले दुःख सांगायचे आणि मनसोक्त रडायचे.

योगासने आणि जापनीज थेरपी यामुळे मन आणि शरीर यांचे कोओर्डीनेशन व्हायला मदत होते. मनातील भावना मोकळ्या करण्यासाठीचे हे दोन मार्ग आहेत. मन शांत होऊन वर्तमान परिस्थितीचा स्वीकार करायला मन तयार होते. मानसिक उपचार म्हणून याचा उपयोग जगात सर्वत्र होत आहे. म्हणूनच निराशा झटकून मानसिक संघर्षातून बाहेर पडण्यासाठी स्वतः स्वतःची मदत करा.

– सानिका बाम
एमए योगा, एमए संगीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!