महाराष्ट्रमुख्य बातमी

कोकणातील नुकसानग्रस्त आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील : राजू शेट्टी

मुंबई : कोकणातील नुकसानग्रस्त आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित केलेला सर्वपक्षीय मोर्चा आंदोलकांची धरपकड, अडवणूक करून सरकारने हाणून पाडला.

राजू शेट्टींसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संपकाळ, शिवसेना नेते विनायक राऊत, अरविंद सावंत, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, मराठी भाषा समितीचे दीपक पवार, प्रकाश रेड्डी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी मोर्चा स्थळी जाण्यापूर्वीच ताब्यात घेतल्यामुळे नियोजित मोर्चा निघू शकला नाही.

नैसर्गिक आपत्तींमुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा उत्पादकांना प्रति हेक्टर पाच लाख रूपये आणि काजू उत्पादकांना प्रति हेक्टर तीन लाख रुपये भरपाई द्यावी आणि अर्धवट राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

मंत्रालय परिसरातील शिवसेनेचे कार्यालय शिवालय येथे शेट्टींसह सर्व नेते जमले होते. ते मोर्चात सहभागी होण्यासाठी निघण्यापूर्वीच त्यांना शिवालय येथून ताब्यात घेण्यात आले. शेट्टींसह अन्य नेत्यांना डोंगरी पोलिस ठाण्यात काही वेळ थांबवून सोडून देण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, आझाद मैदान, मंत्रालय, गिरगाव चौपाटी आणि पायधुनी येथून पोलिसांनी आंदोलकांना मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांना आझाद मैदानावर ठेवण्यात आले होते, तीन – चार तास बसवून ठेवल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही : सपकाळ

मागील तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहे. शेतकरी विरोधी भाजप सरकारने आंदोलकांची अडवणूक केली. पण, सरकारच्या या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. कोकणातील शेतकऱ्यांच्या पदरात भरीव मदत पडेपर्यंत, हा लढा थांबणार नाही, अशा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

असा मुख्यमंत्री, असे पोलिस पाहिले नाहीत : शेट्टी

मी १९९५ पासून, म्हणजे ३० वर्षांपासून आंदोलन करीत आहे. या काळात मी सात मुख्यमंत्री पाहिले. पण, अशी वाईट वागणूक कधीच मिळाली नाही. गिरगाव चौपाटीपासून मोर्चा निघणार होता. आम्ही शिवालयात बसलो होतो. आंदोलन स्थळापासून दोन – अडीच किमी लाब शिवालयता घुसून आम्हाला ताब्यात घेतले. आम्ही नक्षलवादी, दहशतवादी आहोत का ? गिरगाव चौपाटीवर आंदोलकांना उतरूच दिले नाही. आठ फेब्रुवारीपासून आम्ही आंदोलन करीत आहोत, अडीच महिन्यांपासून फडणवीस यांची वेळ मागतो आहे, तरीही आम्हाला भेटण्याची वेळही दिली जात नाही. त्यामुळे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत, भरपाई मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!