मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रायपाटण येथील हॉटेल आगीत भस्मसात 

राजापूर : तालुक्यातील रायपाटण ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या गणेश कृपा हॉटेलला अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल भस्मसात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आग शॉर्ट सर्किटने लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आग विजविण्यासाठी राजापूर नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र अग्नीशामक दलाची गाडी रात्री घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझविण्यात आली. तोपर्यंत आगीत गोडेकर यांचे सर्व साहित्य भस्मसात झाले होते.

सदानंद महादेव गोडेकर यांचे हे हॉटेल असून ते सायंकाळी काही कामनिमित्त पाचलला गेले होते. नेमकी त्या दरम्यान आग लागली होती. हॉटेल बंद असल्याने कुणाच्या लक्षात आले नव्हते. हॉटेल मालक गोडेकर पाचल येथून परत आले असता त्यांना हॉटेलमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ हॉटेलचा दरवाजा उघडला असता आतमध्ये मोठी आग लागल्याचे आढळून आले.

आग लागल्याचे समजताच आजूबाजूची मंडळी देखील धावून आली. त्यांनी आग विझवायला सुरवात झाली; मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीत गोडेकर यांचे सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी आणलेले किराणा सामान, औषधे, अंथरूण, कपडे व अन्य साहित्य यांचा समावेश होता. ते त्याच हॉटेलमधील छोट्या जागेत रहात होते.

मदतीसाठी धावून आलेल्या ग्रामस्थांनी हॉटेलमधील एक भरलेला आणि दोन रिकामी सिलेंडर तात्काळ बाहेर काढले. त्यामुळे मोठा धोका टळला. आगीत नेमके किती नुकसान झाले ते समजू शकले नाही. रायपाटण पोलीस दूरक्षेत्राला घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील पोलीस कर्मचारी रामदास पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!