मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

खेडमध्ये भीषण वणवा; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

खेड : शहरातील कुवार साई परिसरात दुपारच्या सुमारास भीषण वणवा लागल्याची घटना घडली. भर दुपारी अचानक लागलेली आग क्षणाक्षणाला वेगाने पसरत असल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे ही आग जवळील घरांच्या दिशेने झपाट्याने सरकत असल्याने मोठ्या अनर्थाची शक्यता निर्माण झाली होती.

आगीची तीव्रता पाहून स्थानिक नागरिकांनी तात्काळ भाजपचे नेते ॲड. वैभव खेडेकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत ॲड. खेडेकर यांनी विलंब न लावता खेड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून त्वरित मदतीची मागणी केली.

माहिती मिळताच खेड पालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला. आगीने रौद्ररूप धारण केले असतानाही अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांसह आजूबाजूचा भाग सुरक्षित करत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आग घरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विझवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आणि अनेक कुटुंबांचे संभाव्य नुकसान वाचले.

या बचाव मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, सहायक फायरमन जयेश पवार, सहायक फायरमन प्रणय रसाळ, सहायक फायरमन सुरज शिगवण तसेच वाहन चालक गजानन जाधव यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. धगधगत्या आगीमध्ये जीवाची पर्वा न करता त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे संभाव्य मोठे नुकसान टळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!