मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चिपळुणात रंगले अनोखे ‘बांधावरचे साहित्य संमेलन’

निसर्ग संवर्धन, बदलती भाषा, साहित्याची सामाजिक भूमिका यावर अभ्यासपूर्ण मंथन

धामणवणे (चिपळूण) : येथे निसर्गाच्या कुशीत, काजूच्या गर्द वनराईत, शेणामातीने सारवलेल्या शेताच्या बांधावर भरलेले ‘बांधावरचे साहित्य संमेलन’ हा मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव आणि अनुकरणीय प्रयोग ठरला. संमेलनात निसर्ग संवर्धन, बदलती भाषा, साहित्याची सामाजिक भूमिका यावर अभ्यासपूर्ण मंथन झाले. या अनोख्या संकल्पनेचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास’ या ब्रीदवाक्याने प्रेरित हे संमेलन रविवारी (ता. ८) चिपळूणजवळील धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळ असलेल्या ‘साद मयुराची’ शिवारात पार पडले. संमेलनाचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीने – श्रीसातेरी मातेच्या वारूळ पूजनाने, संबळ वादनाच्या निनादात आणि बांधावर दीपप्रज्वलन करून करण्यात आले. संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के, उद्घाटक डॉ. प्रशांत पटवर्धन, स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी, आमदार शेखर निकम, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष लाड, कवी अरुण म्हात्रे यांच्यासह राज्यातील अनेक नामवंत साहित्यिक व रसिक उपस्थित होते.

प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविकातून बांधावरच्या संमेलनामागील संकल्पना मांडली.

“आपण निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत. त्यामुळे साहित्यही निसर्गापासून वेगळे असू शकत नाही,” असे मत संमेलनाध्यक्ष प्रा. बारटक्के यांनी मांडले. डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी आजच्या तरुणाईच्या बदलत्या भाषिक प्रवाहाचे स्वागत करण्याची गरज अधोरेखित केली.

दुसऱ्या सत्रात विजय जोशी यांनी ‘कविता : तंत्र आणि मंत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात कथाकथन आणि ‘माती, नाती अन् माणूस’ या विषयावरील काव्यसंमेलन विशेष रंगले. अरुण म्हात्रे आणि कैलास गांधी यांच्या काव्यनोकझोकीने रसिकांची दाद मिळवली.

समारोपप्रसंगी डॉ. तानाजीराव चोरगे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन साहित्यिकांनी शेती, माती आणि शेतकऱ्याचे जीवन अनुभवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “बांधावरचे साहित्य संमेलन ही केवळ कल्पना नसून काळाची गरज आहे,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या संमेलनात प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला. निसर्गातील वस्तूंनी सजावट, झाडांवर टांगलेल्या कविता, बांधावरच व्यासपीठ, गाद्यांवर बैठक व्यवस्था, तसेच झुणका-भाकर, वरण-भात, आंबोळी-घावणे, मोंगा-पोपटी असा अस्सल कोकणी ग्रामीण भोजन हा अनुभव रसिकांच्या मनात घर करून गेला.

महाराष्ट्र साहित्य परिषद (चिपळूण शाखा) आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद व साहित्य भारती यांचे सहकार्य लाभले. संकल्पक कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, धीरज वाटेकर, अरुण इंगवले यांच्यासह संयोजन समितीच्या सदस्यांच्या अथक परिश्रमामुळे हा साहित्यिक सोहळा संस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!