मुख्य बातमी

रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम

'दादासाहेब पोतनीस पारितोषिका'चे मानकरी : विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू जोगींदर विसेन यांच्या पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान

रत्नागिरी : माध्यमिक विद्यालय वरवडे (भागशाळा खंडाळा, ता. जि. रत्नागिरी) येथील उपशिक्षक संजय कृष्णा जाधव यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब पोतनीस पारितोषिक २०२५’ जाहीर करण्यात आला असून, १ जुलै रोजी विद्यापीठाच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला.

नाशिक येथे झालेल्या या समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू जोगींदर विसेन यांच्या हस्ते जाधव यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि विविध अभ्यासकेंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संजय जाधव यांनी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिझम इन्स्टिट्यूट येथे पूर्ण केला. या यशाबद्दल अभ्यासकेंद्राच्या प्रमुख धनश्री धनंजय पालांडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत, त्यांच्या यशामुळे संस्थेचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढल्याची भावना व्यक्त केली.

गेली २६ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय जाधव हे अध्यापनाबरोबरच पत्रकारिता, लेखन, सामाजिक प्रबोधन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत असतानाच त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.

पत्रकारिता पदविका परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून ‘दादासाहेब पोतनीस पारितोषिक’ प्राप्त करणारे संजय जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!