मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ग्रंथदिंडीने ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे भव्य उद्घाटन

ग्रंथदिंडीने घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

चिपळूण : तालुक्यातील मांडकी–पालवण येथे कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित राज्यातील पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून (१३ फेब्रुवारी) शानदार सुरुवात झाली. १३, १४ व १५ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या राज्यस्तरीय संमेलनाच्या पहिल्याच दिवशी काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने महाराष्ट्राच्या लोककलेसह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

मांडकी-गावातून पारंपरिक वेशभूषेत, ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम, टाळ-मृदुंग, वारकरी संप्रदायाची पताका, संत साहित्याची प्रतिकात्मक मांडणी आणि कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या देखाव्यांसह भव्य दिव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार चळवळीचा इतिहास दर्शविणाऱ्या फलकांनी आणि साहित्यिकांच्या प्रतिमांनी दिंडी अधिक आकर्षक ठरली. विद्यार्थी, शेतकरी, महिला बचतगट, साहित्यप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार क्षेत्राचे मोलाचे योगदान राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक व अनुभवाधारित दर्शन घडविणारे हे संमेलन मांडकी–पालवण येथे संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर होत आहे. स्वागताध्यक्ष तथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

संमेलनादरम्यान ग्रामीण साहित्य, कृषी सुधारणा, सहकार चळवळ आणि कोकणातील सांस्कृतिक वारसा या विषयांवर परिसंवाद, कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन, मुलाखती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण जीवनातील बदल, सहकारातील मूल्ये तसेच साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन या विषयांवर नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.

या संमेलनात अभिनेते संजय खापरे आणि हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या सहभागामुळे संमेलनाच्या उत्साहात अधिक भर पडणार आहे. “साहित्यातील शब्दांचा उत्सव, शेतीचा संघर्ष आणि सहकारातून समृद्धी या विषयांवर विचार ऐकण्याची ही उत्तम संधी आहे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. संजय भावे, तर प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे कार्यरत आहेत. संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे असून राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर या संमेलनात सहभागी झाले आहेत.

प्रसिद्धी प्रमुख डॉ. शमिका चोरगे आणि संचालिका तथा स्मरणिका संपादिका अंजलीताई चोरगे यांनी ग्रामीण, कृषी व सहकार चळवळीतील कार्यकर्ते तसेच साहित्यप्रेमींनी या ऐतिहासिक संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

ग्रामीण जीवन, शेती, सहकार आणि मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा जागर करणारे हे संमेलन कोकणातील साहित्यिक, शेतकरी, विद्यार्थी आणि रसिकांसाठी वैचारिक व सांस्कृतिक पर्वणी ठरत असून, ग्रामीण व कृषी साहित्याला नवी दिशा देणारे व्यासपीठ म्हणून या संमेलनाकडे पाहिले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!