मुख्य बातमी

रत्नागिरीत मधुभाई – साहित्य, समाज कृतज्ञता सोहळा

अनुवाद अकादमीतून मराठी साहित्य अन्य भाषेत ; मराठीचे ऑनलाईन शिक्षण : मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : “मराठी साहित्यिकांनी लिहिलेलं साहित्य अन्य भाषांमध्ये प्रकाशित व्हावे हा संकल्प स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केला होता. पण, त्याची अंमलबजावणी का झाली नाही मला माहीत नाही. अनुवाद अकादमी तयार करून त्याची अंमलबजावणी या अकादमीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय विश्व मराठी साहित्य संमेलनात घेतोय. ज्या लेखकाला त्याचं साहित्य मराठीतून हिंदीत करायचं असेल, मराठीतून कन्नडमध्ये करायचं असेल, मराठीतून तमिळमध्ये करायचं असेल तर त्याला देखील निधी द्यायचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे. परदेशातील मराठी मुलांना ऑनलाईन मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून सुरू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “मधुभाई – साहित्य, समाज कृतज्ञता सोहळा” निमित्ताने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा व प्रकट मुलाखत कार्यक्रम काल (१४ फेब्रुवारी) येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. यावेळी साहित्यिक विश्वास पाटील, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते. मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

डॉ. सामंत पुढे म्हणाले, “मराठी भाषा पुढे नेण्यासाठी जे जे काही करावे लागेल ते मंत्री या नात्याने करायला नक्की तयार आहे. मी मंत्री झाल्यापासून २७ फेब्रुवारीचा कार्यक्रम आता गेट वे ऑफ इंडियाला करतो. ज्यावेळी आपण मोठ्या मंचावर करतो, त्यावेळी त्याची कुठेतरी चर्चा होते आणि त्याच्यातून अजून तरुण साहित्यिक निर्माण व्हावेत ही या कार्यक्रमा मागील भावना आहे. मराठी भाषा विभागाला वित्त मंत्री अजितदादांनी २६५ कोटी रुपये दिले. त्यामधून सगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन असेल, युवा साहित्य संमेलन असेल, दिल्लीचे आमचे मराठी साहित्य संमेलन असेल, परवा झालेलं साताऱ्याचं मराठी साहित्य संमेलन असेल. आज मराठी भाषेचं दालन महाराष्ट्राच्या कुठल्याही काना कोपऱ्यामध्ये उभारण्याची ताकद आज मराठी भाषा विभागाची झालेली आहे. काश्मीरला देखील मराठी पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय माझ्या मराठी भाषा विभागाने घेतलेल्या आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेएनयू मध्ये कधी घटना घडली नव्हती, आज जेएनयूमध्ये कुसुमाग्रजांच्या नावाचं मराठीचं अध्यासन केंद्र आहे. जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर एमए चा अभ्यासक्रम तयार केला. मुलं छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा शिकतात हे आमच्या मराठी भाषेचं काम आहे.”

रत्नागिरीमध्ये अशी एक नगरपालिकेची शाळा आहे की ज्याचा आदर्श इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतला पाहिजे. त्याचं नाव दामले विद्यालय आहे. विद्यालयाच्या पहिल्या वर्गामध्ये वेटिंग १०० मुलांचं असतं. पहिली ते दहावीमध्ये आता पंधराशे विद्यार्थी शिकतात.

मराठी साहित्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. मराठी साहित्याची किंमत आपल्याला कधी कळते, तंजावरला गेल्यावर कळते. बेळगावला गेल्यावर कळते. दिल्लीला गेल्यावर कळते, परदेशात गेल्यावर कळते. मुंबई हे शहर हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. सगळ्या जाती धर्माचे विविध भाषिक लोक इथे येतात. पुढच्या वर्षभरामध्ये माझा मराठी भाषा विभाग अशा पद्धतीचे तंत्रज्ञान तयार करणार आहे की जो परदेशातला, परराज्यातला माणूस महाराष्ट्रामध्ये येतोय त्याला मराठी बोलता येत नाही त्याला आम्ही मराठीत बोलवून दाखवू, अशा पद्धतीची भूमिका मराठी भाषेचा विभाग भविष्यामध्ये घेणार आहे आणि त्याच्यासाठी देखील आम्ही उपक्रम सुरू करतोय, असेही ते म्हणाले.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सत्काराला उत्तर दिले. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जयु भाटकर यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास कोकण विभागातील साहित्यिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!