मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

रत्नागिरी : लांजा येथे अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आशितोष अनिल जाधव (२०, रा. लांजा) असे आरोपीचे नाव आहे. ही संतापजनक घटना १५ जुलै २०२३ रोजी लांजा येथे घडली होती.
याप्रकरणी लांजा पोलिसांकडून आशितोष याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून ॲड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. याबाबत गुह्यातील माहितीनुसार १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शाळेतून सुटल्यानंतर घरी चालत जात होती. यावेळी तिच्यासोबत शाळेतील दोन मुलं होती. आरोपी आशितोष हा पिडितेजवळ आला आणि त्याने तिच्यासोबत असलेल्या दोना मुलांना धमकावून वेगळ्या रस्त्याने घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार घाबरलेली दोन्ही मुले वेगळ्या रस्त्याने घरी जाण्यास निघाली.
पीडित मुलगी एकटीच राहिली असल्याचे पाहून आरोपी याने तिचा जबरदस्तीने हात पकडला. तसेच जवळच असलेल्या एका शासकीय उपकेंद्राच्या मागील बाजुला ओढत घेवून गेला. याठिकाणी आरोपीने पिडितेवर अत्याचार केला. तसेच घडला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. घरी परतल्यानंतर पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी तिला धीर देत चौकशी केली असता तिने घडलेली घटना नातेवाईकांसमोर उघड केली.
याप्रकरणी या मुलीच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (ए)(बी), ५०४,५०६ तसेच बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, ९ (एम), १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपास तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. व्ही. देशमुख यांनी केला. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीसोबत असलेल्या एक शाळकरी मुलाची देखील साक्ष नोंदविण्यात आली. खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाशी शिक्षा ठोठावली. न्यायालयापुढे पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल राजेश शिंदे यांनी काम पाहिले.



