गड किल्ले प्रतिकृती स्पर्धेत आबलोलीच्या चंद्रकांत बाईत विद्यालयाचा जिल्ह्यात डंका

आबलोली (संदेश कदम) : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ‘गड किल्ले प्रतिकृती निर्मिती’ स्पर्धेत आबलोली (ता. गुहागर) चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या प्रतिकृतीने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जिल्हास्तरावरील या अटीतटीच्या स्पर्धेत बाजी मारल्याबद्दल विद्यार्थ्यांना ७,५०० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास आणि गडकिल्ल्यांची स्थापत्यशैली विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृतीतून हुबेहूब साकारली होती, ज्याची परीक्षकांनी विशेष प्रशंसा केली.
विद्यालयाच्या या यशात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये प्रेयश प्रसाद पेडणेकर, श्रेयस भरत डिंगणकर, अद्वैत सुरेश ठोंबरे या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती अत्यंत बारकाव्यांसह तयार केली होती.
या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे भरभरून कौतुक होत आहे. लोक शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सचिन बाईत व सर्व कार्यकारिणीने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आबलोली परिसराचे नाव जिल्हास्तरावर उंचावले आहे.


