झोंबडी (गुहागर) सरपंच, ग्रामसेवकानी केला लाखोंच्या निधीचा गैरव्यवहार
सरपंचांवर अविश्वास दर्शक ठराव दाखल करून ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल करणार : ग्रामस्थांची पत्रकार परिषदेत माहिती

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायत सरपंच अतुल लांजेकर आणि ग्रामसेवक यांनी अनेक शासकीय योजना राबवताना आर्थिक व्यवहाराचा लाखो रुपयांचा घोटाळा आणि गैरव्यवहार केल्याची माहिती आपण रीतसर तक्रार करून शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला देणार आहोत. तसेच सरपंच यांच्यावर अविश्वास दर्शक ठराव दाखल करणार असून आर्थिक गैरव्यवहार केल्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली.
झोंबडी ग्रामपंचायतीत झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात विकासकामे करताना किंवा वस्तू खरेदी करताना त्यावर खर्च प्रमाणापेक्षा जास्त करून कमी किंमतीची, कमी दर्जाची वस्तू जास्त किंमतीत विकत घेणे, टेंडर न काढता (पेपरला जाहिरात न देता) कामे करणे, निकृष्ट दर्जाच्या वस्तू ग्रामस्थांना वितरित करणे, असे अनेक आरोप ग्रामस्थांनी केले असून सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सरपंच यांच्यावर अविश्वास दर्शक ठराव दाखल करणार आणि सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली.

