ताज हॉटेलच्या पंचतारांकित पाहुणचाराने दिव्यांग विद्यार्थी भारावले

अलिबाग (राजेश बाष्टे) : अलिबागमधील आरसीएफ कॉलनीतील विशेष मुलांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना गोंधळपाडा येथील हॉटेल ताजने खास निमंत्रित करून त्यांचा आगळावेगळा पाहुणचार केला. या पाहुणचाराने सारेच भारावले.
आत्मनिर्भर पालक असोसिएशन संचलित विशेष मुलांचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी साडेसात वाजता झाला. यावेळी शाळेचे पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी हजर होते. मुलांना समाजाच्या विविध गोष्टींमध्ये सामावून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या हेतूने ताज अलिबाग रिसॉर्ट अँड स्पा यांच्याकडून भेट देण्याचे आमंत्रण आले आणि मुलांच्या व शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता देसाई यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक इतर सहाय्यक व पदाधिकारी यांनी प्रथमच पंचतारांकित हॉटेलला भेट दिली. प्रथम ताज रिसॉर्टचे जनरल मॅनेजर अनंत गड्वाला यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर सुरक्षारक्षकांची परेड झाली. आत्मनिर्भर पालक असोसिएशनचे अध्यक्ष विनायक देशपांडे यांनी शाळेविषयी प्रस्तावना सांगितली. त्यानंतर शाळेचा विद्यार्थी रोहित धुमाळ याने डान्स सादर केला. “ए मेरे वतन के लोगो “या गीताने सांगता झाली. सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला. सर्व ताज रिसॉर्ट मुलांना दाखवण्यात आले. अनंत गड्डाला यांनी शाळेतील मुलांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी आत्मनिर्भर पालक असो. चे अध्यक्ष श्री. देशपांडे म्हणाले की, “या मुलांसाठी ताज रिसॉर्टने राबवलेला हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय होता. संस्थेच्या वतीने आम्ही विविध उपक्रम राबवून विशेष मुलांना आत्मनिर्भर बनविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्थांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.”



