साकेडी (सिंधुदुर्ग) येथे आढळलेल्या सतीशिळांच्या समूहात एका वैशिष्ट्यपूर्ण सतीशिळेचा शोध
विरगळ व सतीशिळा अभ्यासक स्नेहल बने यांचे संशोधन

कणकवली : तालुक्यातील साकेडी गावामध्ये नुकतेच लिंगेश्वर -गांगोबा मंदिर परिसरामध्ये एकूण १५ सतीशिळांचे २५ मे २०२५ रोजी संशोधन कार्य करण्यात आले होते. विरगळ व सतीशिळा अभ्यासक स्नेहल बने यांनी केलेल्या या संशोधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सती शिळा आढळून आल्या. त्यामध्ये एक लहान मुलाला दुग्धपान किंवा दूध पाजतानाचे शिल्प असलेली सती शिळा अभ्यासक स्नेहल बने यांच्या नजरेस आढळून आली. ही एक वैशिष्ट्यपूर्ण सतीशिळा असून त्या बद्दल सविस्तर माहितीचे वर्णन स्नेहल बने यांनी सांगितले.

सतीची चाल ही मध्ययुगाची वैशिष्ट्य होती. आपल्या भारतात पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची परंपरा होती. आपल्या प्राचीन धर्मग्रंथात याचे फारसे वर्णन उपलब्ध नाही. सतीप्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे असे जरी मानले, तरी वेद ब्राम्हाने गृहसूत्रे, मनुस्मृती, याज्ञवल्यक्यस्मृती इ. धर्म वाङ्मयामध्ये कोठेही सतीप्रथेचा उल्लेख नाही. तरीसुद्धा समाजातील एक रूढ परंपरा म्हणून सतीपद्धत धर्माच्या नावाखाली सर्व प्रांतांत चालत होती.
पतीवरील खरेखुरे प्रेम आणि त्यामुळे त्याच्या पश्चात जगणे अशक्य वाटून स्वेच्छेने स्वीकारलेले अनुमरण. दुसरे मध्ययुगीन काळात सती जाणे हे प्रतिष्ठितपणाचे, उच्च शीलाचे लक्षण मानले जाऊ लागल्यामुळे, तसेच पुर्नविवाह त्याज्य मानला गेल्यामुळे, घरातील ज्येष्ठांचे, समाजाचे दडपण आल्यामुळे स्त्रियांना सती जाणे भाग पडे. तसेच पतीपश्चात होणारी कुचेष्टा, अवहेलना, परावलंबित्व तसेच सासर-माहेरच्या लोकांनी दाखवलेली अस्विकृती, उदासिनता आणि त्यामुळे वाटणारी भीती अशा अनेक कारणांनी बऱ्याच स्त्रियांना आपल्या मनाविरूद्ध अगतिक होऊन सती जाणे भाग पडे.

ज्या स्त्रीला दूधपीते बालक आहेत किंवा ती स्त्री गर्भवती आहे अशा स्त्रीने सती जाऊ नये. जर एखाद्या स्त्रीची मासिक (धर्म)पाळी असेल, तर तिला पाच दिवसांनंतर पतीच्या खडावा (चपला) घेवून सती जायला चार दिवस थांबायचे नसेल, तर तिने स्वतः १० किलो तांदूळ जात्यावर दळावे. त्यानंतर तिने पहिला दिवस असेल तर ३० किंवा दुसरा दिवस २० व तिसरा दिवस असेल तर १०-१० गायी दान करावे. म्हणजे ती शुद्ध होते व सती जाण्यास पात्र होते. नंतर तिने अंगाला माती लावून पाच वेळा स्नान करावे आणि मगच सती जावे.
सद्गुरूचरित्रामध्ये सतीप्रथेबद्दल केलेले वर्णन
जवळ नसता आपुला पति।
त्याती जाहली असेल मृत्यूप्राप्ती।
काय करावे त्याचे सती।
केवी कराये सहगमन।
तुवा असेल गरोदरी।
असे तान्हा कुमार कुमरी।
काय करावे तैसिये नारी।
महानुभव ग्रंथातील वर्णनानुसार राजा रामचंद्र याची राणी कामयानी हिच्यावर तिच्या सावत्र मुलाने म्हणजे सिंघन दुसरा याने सती जाण्यासाठी जबरदस्ती केली होती. अलबेरूनीसारखा इतिहासकार असे लिहितो की, भारतात राण्यांनी सती जावे ही अपेक्षा राज्यकर्ते करीत असत.
सती प्रथा ही प्रामुख्याने राजघराण्यांमध्ये व सरदार घराण्यांमध्ये अस्तित्वात होती. सती जाणारी स्त्री ही पतिव्रता म्हणून तिला समाजात मानाचे स्थान व आदर दिला जात होता. पती पश्चात सती जाणे हे एक प्रकारचे पुण्य कर्मच मानले जाई. अशावेळी अशा पुण्यवान स्त्रियांच्या त्यागाची आठवण म्हणून त्यांची स्मारके किंवा सतीशिळा बनवण्याची पद्धत त्याकाळी समाजात होती. हा संदर्भ हा इतिहासाचे मूक साक्षीदार. विरगळ आणि सतीशिळा शास्त्रज्ञ अनिल दुधाने यांच्या पुस्तकातून घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील इतर सतीशिळांचे अधिक अभ्यास कार्य चालू आहे, असे इतिहास अभ्यासक व विरगळ आणि सतीशिळा अभ्यासक स्नेहल बने यांनी सांगितले.
या संशोधन कार्याला मंदिरातील पुजारी भिकाजी शंकर गुरव, राजाराम गुरव, तसेच ग्रामस्थ श्यामसुंदर राणे, विजय राणे, मुरारी राणे, महादेव राणे, लक्ष्मण राणे, अपूर्वा राणे या मंडळींचे चांगले सहकार्य लाभले, असे अभ्यासक श्रीमती बने यांनी सांगितले.



