प्रसाद पाटील यांच्याकडून ‘आरास’ संस्थेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे बळ

रत्नागिरी : आपल्या वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी आणि भावी पिढीचे भविष्य घडावे या उदात्त हेतूने जाकीमिऱ्या येथील निवृत्त कर्मचारी प्रसाद रमाकांत पाटील यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. वडील रमाकांत पाटील गुरुजी यांच्या स्मरणार्थ प्रसाद यांनी स्पर्धा परीक्षेची अत्यंत उपयुक्त पुस्तके ‘आ. रा. स.’ संस्थेला भेट दिली आहेत.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके विकत घेणे अनेकदा शक्य होत नाही. हीच अडचण ओळखून पाटील यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांनी ही पुस्तके दान करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून गावातील किंवा परिसरातील तरुण प्रशासकीय सेवांमध्ये चमकू शकतील.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘आ. रा. स.’ संस्थेचे अध्यक्ष राकेश सत्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. पाटील यांनी ही पुस्तके संस्थेच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केली. यावेळी बोलताना त्यांनी भावना व्यक्त केली की, “वडिलांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेण्यासाठी ज्ञानादान करण्यासारखा दुसरा मोठा मार्ग नाही.
यावेळी आ. रा. स. संस्थेच्या प्रतिनिधींनी पाटील यांचे आभार मानले. “समाजात अशा प्रकारे पुस्तके दान करण्याची वृत्ती वाढली, तर निश्चितच अभ्यासू तरुणांना मोठे बळ मिळेल,” अशा भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


