मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर नगरपालिकेला १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उत्सव साजरा

राजापूर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजापूर नगरपालिकेने १५० वर्षे वाटचाल पूर्ण केल्याचा उत्सव बुधवारी (१ एप्रिल) विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवाची सुरुवात सकाळी जवाहर चौक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली.

यावेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पालिकेमध्ये श्री सत्यनारायण महापूजा झाली. सायंकाळी ‘होम मिनिस्टर’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला.

राजापूर नगरपालिका ही ब्रिटिशकालीन असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात जुन्या पालिकांपैकी एक मानली जाते. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज आणि डच यांचा ऐतिहासिक संबंध राजापूरशी असल्याचे पुरावे आढळतात. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून राजापूरचा लौकिक होता. १ एप्रिल १८७६ रोजी स्थापन झालेल्या या पालिकेने आज दीडशे वर्षांचा टप्पा गाठला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त नगरपालिका इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच परिसरात भव्य रांगोळी काढण्यात आली. दिवसभर नागरिकांनी पालिकेत भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!