मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

साखरपा येथे प्रवासी ट्रॅव्हल्सला भीषण आग

चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३० प्रवासी थोडक्यात बचावले

संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा जाधववाडी परिसरातील गद्रे पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व ३० प्रवासी सुखरूप बचावले; मात्र या दुर्घटनेत गाडी पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) यांच्या ताब्यातील प्रवासी ट्रॅव्हल्स (क्र. एनएल ०१ बी २४४२) पुणे येथून सायंकाळी सहाच्या सुमारास ३० प्रवाशांना घेऊन रत्नागिरीकडे निघाली होती. ही गाडी पहाटे सुमारे ३.३० वाजता साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर पोहोचताच अचानक वाहनातून धूर आणि नंतर ज्वाळा उठताना चालकाच्या निदर्शनास आले.

चालकाने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता सर्व प्रवाशांना तत्काळ गाडीतून खाली उतरवले. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत ट्रॅव्हल्स पूर्णतः भस्मसात झाली होती. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर तसेच चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मार्ग बदलून दिला तसेच प्रवाशांना आवश्यक ती मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!