हातखंबा बीटमधील शाळांची ११ एप्रिलपासून ‘पटपडताळणी’
बोगस पटाला बसणार चाप : शिक्षण विभागाचा निर्णय

रत्नागिरी : हातखंबा बीटमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. आगामी ११ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या द्वितीय सत्र परीक्षा आणि ‘PAT-२’ परीक्षेच्या काळात सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष ‘पटपडताळणी’ केली जाणार आहे. या मोहिमेमुळे बोगस पटसंख्या दाखवणाऱ्या प्रकारांना आळा बसणार असून, वारंवार गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांवरही निर्बंध येणार आहेत.
द्वितीय सत्र परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व मुलांची शिक्षण विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष शाळेत जाऊन पडताळणी करतील. केवळ हजेरी घेऊन न थांबता, त्याची ऑनलाइन नोंदणी केली जाईल आणि उपस्थित विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष फोटो पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे. ११, १५ आणि २२ एप्रिल या दिवशी होणाऱ्या पेपरच्या वेळीच ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
या परीक्षेला १०० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व शाळांना अशा सूचना दिल्या आहेत : विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना पत्र काढणे. पालक सभा घेऊन या मोहिमेची माहिती देणे. ग्रामपंचायतींशी पत्रव्यवहार करून गावकऱ्यांना अवगत करणे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणे.
दरम्यान, या मोहिमेसाठी विशेष पटपडताळणी पथक तयार करण्यात आले आहे. यामुळे बोगस पटाला आळा बसेल. पालकांनी आणि नागरिकांनी आपल्या पाल्यांच्या १०० टक्के उपस्थितीसाठी सहकार्य करावे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.


