खेड येथे राज्यस्तरीय सन्मान सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : दिशा महाराष्ट्राची आयोजित छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त ५वा राज्यस्तरीय सन्मान सोहळा खेड (जि. रत्नागिरी) येथे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. प्रो कबड्डीचे सुप्रसिद्ध सामनाधिकारी तसेच बीएमसी येथे विभाग निरीक्षक पदी कार्यरत असणारे आत्माराम चव्हाण हे कार्यक्रमाचे तर चौथ्या राज्यस्तरीय कवी संमेलन चे अध्यक्ष म्हणून खेडचे सुप्रसिद्ध साहित्यिक देवानंद यादव होते.
राज्यस्तरीय चौथे कवी संमेलन, नवोदित कलावंतांचा कलाविष्कार कार्यक्रम आणि राज्यस्तरीय पाचवा सन्मान सोहळा अशा भरगोस कार्यक्रमासाठी खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, खेड पंचायत समिती सभापती आफिया पालेकर, खेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक रोहिदास राजेंद्र केंद्रे, कोमसाप दापोलीचे जनसंपर्क प्रमुख संदेश राऊत, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, आशुतोष साळुंखे (प्रो. कबड्डी – मॅच ऑफिशियल), साहित्यिक भाऊसाहेब कांबळे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी (आयएएस) राजेंद्र शेलार, (समाजसेवक), सुधीर कालेकर, हरिश्चन्द्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ऐकून २१ कवींनी आपली कविता सादर केली. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील निवडक व्यक्तिमत्वांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी दिशा महाराष्ट्राची वाहिनी आणि मुख्य संपादक तुषार नेवरेकर नेहमी प्रयत्नशील असते. यावेळी नृत्य, एकपात्री अभिनय, मिमिक्री असे कलाविष्कार सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंदकुमार पिल्ले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिशा महाराष्ट्राचीचे प्रतिनिधी साहिल तांबे, भाऊसाहेब कांबळे तसेच आशुतोष साळुंखे यांनी विशेष मेहनत घेतली.



